Twitter : @NalavadeAnant
मुंबई
शिवसेनेतील अभूतपूर्व फुटीनंतर संघटना बांधणीवर भर दिलेल्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रविवारी त्यांच्या गटाच्या कार्यकारिणीचा नव्याने विस्तार केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड (rebelled by Eknath Shinde in Shiv Sena) करून पक्ष आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह मिळवले. या बंडानंतर ‘मातोश्री’शी एकनिष्ठ राहून शिंदे गटाशी न्यायालयीन आणि रस्त्यावरील लढाईत दोन हात करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना नेतेपदी संधी देऊन उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर जणू एकप्रकारे विश्वासच टाकला आहे.
सध्या पक्षाचे सचिव म्हणून कार्यरत असलेल्या खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut), राज्यसभा सदस्य अनिल देसाई (Anil Desai) आणि माजी मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यासह सहा जणांना नेतेपदी बढती देण्यात आली आहे. नेतेपदी वर्णी लागलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये ठाण्याचे खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र वायकर आणि ठाकरे गटाचे विधिमंडळातील प्रतोद सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांचाही समावेश करण्यात आला आहे.
पुढील वर्षाच्या सुरुवातीला होऊ घातलेली लोकसभा (Lok Sabha election 2024) आणि त्यानंतर होणारी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या गटाची फेररचना केली आहे. या फेररचनेत कल्याणचे विजय उर्फ बंड्या साळवी, परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव, कोल्हापूरचे संजय पवार, मुंबईच्या माजी नगरसेविका राजुल पटेल, शीतल देवरुखकर, शरद कोळी, अस्मिता गायकवाड, नाशिकच्या शुभांगी पाटील, जान्हवी सावंत आणि छाया शिंदे यांच्यावर उपनेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
याशिवाय खासदार श्रीकांत शिंदे (Kalyan MP Shrikant Shinde) यांचा मतदारसंघ असलेल्या कल्याणमध्ये विजय साळवी यांना तर मराठवाड्यात संजय जाधव यांना संघटनेत स्थान देऊन त्यांनाही अधिकचे बळ देण्याचाही प्रयत्न केलेला दिसत आहे.
युवा शिवसेनेचे सचिव म्हणून काम करणाऱ्या वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांना मुख्य संघटनेत सचिव म्हणून स्थान देत बढती देण्यात आली आहे. त्यातही सरदेसाई हे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचे मावसबंधू आहेत. समाज माध्यमात ठाकरे गटाची बाजू प्रभावीपणे मांडणारे मुंबई विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य साईनाथ दुर्गे आणि चेंबूरचे आमदार प्रकाश फातर्पेकर यांची कन्या माजी नगरसेविका सुप्रदा फातर्पेकर यांची सचिवपदी वर्णी लागली आहे. तर संघटक म्हणून मुंबईचे विलास व्हावळ, विलास रुपवते आणि छत्रपती संभाजीनगरचे चेतन कांबळे यांना संधी देण्यात आली आहे.
आता शिवसेना नेते असे असतील : मनोहर जोशी, लीलाधर डाके, दिवाकर रावते, सुभाष देसाई, आदित्य ठाकरे, संजय राऊत, चंद्रकांत खैरे, अनंत गीते, अरविंद सावंत, भास्कर जाधव, विनायक राऊत, अनिल देसाई, अनिल परब, राजन विचारे रवींद्र वायकर आणि सुनील प्रभू