मुंबई – “जनतेला आता या नाटकांचा कंटाळा आला आहे. महाराष्ट्रात महायुतीची त्सुनामी एवढी प्रचंड आहे की आघाडीचे नेते गोंधळून गेले आहेत. सत्ता गेल्यानंतर भ्रष्टाचाराचे आरोप करणारेच आता पळापळ करत आहेत,” अशी तीव्र टीका सांस्कृतिक कार्यमंत्री आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी केली.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर (मविआ) जोरदार टीका केली.
भाजप मुंबईचा महापौर ‘गुजराती’ करणार असल्याच्या टीकेवर उत्तर देताना शेलार म्हणाले, “मग त्यांना मुंबईत मुस्लिम महापौर करायचा आहे का?” उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी खोटे आरोप करत असल्याचेही त्यांनी म्हटले. “चोरावर मोर होऊन आमच्यावर आरोप करणारे हेच लोक आहेत. मुंबईकरांच्या कराच्या पैशावर काही मोजके नेते सुखसोयी उपभोगत होते. आम्ही विकासासाठी काम करतो, आणि हे आरोपांच्या आड लपण्याचा प्रयत्न करतात,” असे शेलार यांनी सांगितले.
भाजप सत्तेत आल्यास प्रत्येक निर्णय पारदर्शक आणि जनतेच्या हिताचा असेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
बीकेसीत उभारणार जागतिक दर्जाचे वस्तुसंग्रहालय
सांस्कृतिक कार्यमंत्री शेलार यांनी जाहीर केले की, महाराष्ट्र सरकार बांद्रा येथील बीकेसीत जागतिक दर्जाचे वस्तुसंग्रहालय उभारणार आहे. “ज्ञानेश्वरी जगभर पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. संत ज्ञानेश्वर यांचा विचार आणि महाराष्ट्राची संतपरंपरा, संस्कृती व मराठी भाषेचा अभिमान जगभर पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे,” असे ते म्हणाले.
दिवाळी अंकांना अनुदानाची मागणी
मराठीचा अभिजात वारसा जपणाऱ्या दिवाळी अंकांना अनुदान देण्यात यावे, अशी मागणी करणारे निवेदन शेलार यांना यावेळी देण्यात आले. हे निवेदन मुंबई मराठी पत्रकार संघ, रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंच, ग्रंथाली, दिवा प्रतिष्ठान आणि दिवाळी अंक प्रकाशक संघ यांच्या वतीने सादर करण्यात आले.
या वेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर, राजेंद्र हुंजे, विश्वस्त देवदास मटाले आणि अजय वैद्य व्यासपीठावर उपस्थित होते.

