मुंबई: जोगेश्वरी पूर्व येथील सुभाष रोड लगत रेल्वे रेषांच्या बाजूला असलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी आज सकाळी त्यांच्या हक्कांसाठी “बिराड मोर्चा” काढला. सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या शांततापूर्ण आंदोलनाचा उद्देश झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाच्या मागण्या मांडणे आणि सरकार व रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधणे हा होता.
मोर्चामध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक, तसेच लहान मुलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. मात्र, मोर्चा पुढे जात असताना पोलिसांनी अचानक लाठीचार्ज केला, ज्यामुळे अनेक महिला आणि जेष्ठ नागरिक जखमी झाले. पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले असून त्यांना जोगेश्वरी पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.
#Watch : जोगेश्वरी येथे “बिराड मोर्चा”वर पोलिसांचा लाठीचार्ज, शांततापूर्ण आंदोलनाला हिंसक वळण#Jogeshwari #PoliceLathicharge #Protest
— rajkaran (@therajkaran) January 22, 2025
@CPMumbaiPolice @CMOMaharashtra @AdvAmolMatele pic.twitter.com/GY4bpyBXYI
नागरिकांचा आरोप: शांततेवर गदा
पोलिसांनी आंदोलनकर्त्यावर कोणतीही पूर्वसूचना न देता लाठीचार्ज केला, असा आरोप आंदोलनकर्ते यांनी केला आहे. “शांततेने मोर्चा काढणाऱ्या महिलांवर आणि वृद्धांवर अनावश्यक जबरदस्ती करण्यात आली. हा आमच्या लोकशाही हक्कांना दाबण्याचा प्रयत्न आहे,” असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

मागण्या आणि निवेदन
झोपडपट्टीवासीयांनी पुढील मागण्या मांडल्या:
1. शांततेने आंदोलन करण्याचा अधिकार अबाधित ठेवावा.
2. लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी.
3. झोपडपट्टीतील नागरिकांच्या पुनर्वसनाच्या मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात.
आंदोलनकर्त्यांचे निवेदन असे होते: “आम्ही कोणत्याही प्रकारची हिंसा केली नाही. हा मोर्चा केवळ आमच्या मूलभूत हक्कांसाठी होता. पोलिसांचा लाठीचार्ज हा लोकशाही मूल्यांवर आघात करणारा आहे. आम्हाला न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील.”
नागरिकांमध्ये संतापाची लाट
लाठीचार्जनंतर परिसरात संतापाचे वातावरण पसरले आहे. मोर्चाचे आयोजक पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बैठक घेत आहेत. यासंदर्भात लवकरच अधिकृत तक्रार दाखल केली जाणार आहे.