महाड : रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार, रायगड जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा उमाताई मुंडे यांनी महाड शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी सौ. पूजा मंगेश जगताप यांची गुरुवारी नियुक्ती केली. या नियुक्तीचे पत्र महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस हनुमंत जगताप यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी महाड विधानसभा महिला अध्यक्षा निता शेठ, माजी जिल्हा परिषद सदस्य अपर्णा जाधव तसेच अन्य महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
नियुक्तीनंतर बोलताना पूजा जगताप म्हणाल्या की, महाड शहर महिला अध्यक्षपदाची जबाबदारी सार्थकी लावण्यासाठी महाड तालुक्यातील महिलांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत. महाड नगरपरिषद निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचल्याने पक्षाच्या महिला उपक्रम व धोरणे प्रत्येक महिला मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे काम अधिक वेगाने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी खासदार सुनील तटकरे, आदिती तटकरे, उमाताई मुंडे आणि स्नेहल जगताप यांचे आभार मानले.

