विनयभंग प्रकरणी शिक्षा भोगूनही दोन अल्पवयीन मुलींवर अश्लील वर्तन; पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
महाड : विनयभंग प्रकरणी यापूर्वी तुरुंगवास भोगून आलेल्या एका विकृत वृत्तीच्या तरुणाने पुन्हा एकदा दोन अल्पवयीन मुलींवर अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना महाड शहरात उघडकीस आली आहे. सोमवारी (१४ एप्रिल) दुपारी महाडमधील एका सोसायटीच्या कार्यालयात ही घटना घडली असून, याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात संबंधित तरुणाविरोधात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन अल्पवयीन शाळकरी मुली शिक्षणानंतर काही कामानिमित्त सदर कार्यालयात गेल्या असता, ओंकार रजनीकांत रणदिवे (वय २७, रा. महाड) याने तेथे येऊन मुलींवर अश्लील वर्तन केले. त्याच्या कृत्यामुळे संबंधित मुलींच्या मनात लज्जा उत्पन्न झाली. याप्रकरणी मुलींच्या पालकांनी तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
त्यानुसार, महाड पोलीस ठाण्यात रणदिवे याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ७४, ७५ (१), ७५ (२), ७६, ७९ आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ (POCSO Act) अंतर्गत कलम ७, ८, ११ (१), १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, महाड शहरात या घटनेमुळे संतापाची लाट उसळली आहे. विकृत मानसिकतेच्या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे.