मुंबई : जय महाराष्ट्र नगर, बोरीवली (पूर्व) येथील कै. प्रबोधनकार ठाकरे ग्रंथालय/वाचनालय वाचवून ते टिकवणे आणि पुढे वाढवणे हेच काळाचे मोठे आव्हान असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. तसेच, उत्तर मुंबई पत्रकार संघामध्ये पत्रकारांची एकजूट अबाधित ठेवून पत्रकार भवनाची निर्मिती करणे हीच ज्येष्ठ राजकीय विश्लेषक व समाजसेवक विजय वैद्य यांना खरी आदरांजली ठरेल, असेही मान्यवरांनी नमूद केले.
विजय वैद्य यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त उत्तर मुंबई पत्रकार संघ आणि मागाठाणे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आदरांजली सभा घेण्यात आली. या सभेत उपस्थित मान्यवरांनी वैद्य यांच्या आठवणींना उजाळा दिला.
सभेचे अध्यक्ष विनायक घोडे (अध्यक्ष, उत्तर मुंबई पत्रकार संघ) होते. प्रवीण वराडकर (सरचिटणीस), रविंद्र राऊळ (कोषाध्यक्ष), ज्येष्ठ पत्रकार–कवी विजय तारी, ज्येष्ठ पत्रकार नितीन सावंत, छायाचित्रकार संदीप टक्के यांच्यासह अनेकांनी विजय वैद्य यांच्या कार्याची उजळणी करून श्रद्धांजली वाहिली.
बोरीवली–ठाणे भूयारी मार्ग प्रकल्पामुळे ग्रंथालयाची इमारत जाणार आहे. त्यामुळे नवीन जागा मिळवण्यासाठी मंत्रालय आणि MMRDA स्तरावर पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती सभेत देण्यात आली. “ग्रंथालय केवळ वाचवायचे नाही, तर त्याचा विस्तार करणे आवश्यक आहे,” असा ठाम सूर यावेळी उमटला.
विजय वैद्य यांनी सुरु केलेले उपनगरचा राजा सार्वजनिक श्री गणेशोत्सव आणि जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला हे उपक्रम अविरतपणे सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच बोरीवलीकडील भूयारी मार्गाला विजय वैद्य यांचे नांव द्यावे, अशी मागणीही सभेत करण्यात आली.
प्रा. नयना रेगे, शुभदा शिंदे, अमित मोरे, दादासाहेब शिंदे, योगेंद्र ठाकूर, सुभाष देसाई, वसंत सावंत, शाम साळवी, जयवंत राऊत, स्मिता डेरे, संजना वारंग, सुरेखा देवरे, राकेश वायंगणकर, हेमंत पाटकर, कीर्ती कुमार शिंदे, शाम कदम आदींनी हृदयपूर्वक आदरांजली अर्पण केली.