मुंबई : राज्यात सोमवारी झालेल्या मान्सूनपूर्व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, त्यांची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना “तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरीत आर्थिक मदत देण्याचे” स्पष्ट आदेश दिले.
गेल्या काही दिवसांत राज्याच्या विविध भागांमध्ये झालेल्या अतीवृष्टीमुळे फळबागा, भातशेती, भाजीपाला तसेच कडधान्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही भागांत वादळामुळे झाडे उन्मळून पडली, तर अनेक भागांत नाल्यांना पूर आल्याने शेती पाण्याखाली गेली आहे. यामुळे आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांची अडचण अधिकच वाढली आहे.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. कोणताही शेतकरी या आपत्तीमध्ये मदतीपासून वंचित राहणार नाही.”
राज्य सरकारच्या या तात्काळ प्रतिसादामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र, या मदतीचे वितरण पारदर्शक आणि वेळेत होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अधिक दक्षता घेण्याची गरज कृषी क्षेत्रातून व्यक्त होत आहे.