मुंबई: ‘शिक्षणाचे माहेरघर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातील मुख्य व अंतर्गत रस्ते तसेच पदपथांवरील अतिक्रमणामुळे वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या जातील, असे मंत्री Shambhuraj Desai यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात स्पष्ट केले.
सदर लक्षवेधी सूचना सदस्य Bapusaheb Pathare यांनी उपस्थित केली होती. पुण्यात प्रचंड वाहतूक कोंडी होत असून विद्यार्थी प्रशिक्षण व महाविद्यालयात वेळेवर पोहोचू शकत नाहीत, असा मुद्दा त्यांनी मांडला. तक्रार करणाऱ्या नागरिकांची नावे काही अधिकारी फेरीवाल्यांना कळवितात, त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. अतिक्रमणे तातडीने हटवून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
पुणे शहरातील किमान १८ प्रमुख रस्त्यांवर गंभीर वाहतूक समस्या असल्याकडेही सदस्यांनी लक्ष वेधले.
उत्तर देताना मंत्री देसाई म्हणाले की, काही फेरीवाले परवानाधारक आहेत; मात्र अनधिकृत फेरीवाल्यांची अतिक्रमणे हटविण्यात येतील. तसेच संबंधित अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्याच्या सूचना देण्यात येतील.

