केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांना पत्र; राज्यातील युरिया साठा केवळ २.३६ लाख मेट्रिक टनावर
मुंबई : “महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात युरियाची कमतरता भासू नये यासाठी तातडीने अतिरिक्त पुरवठा करावा,” अशी मागणी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी केंद्र सरकारचे रसायन व खत मंत्री जे.पी. नड्डा यांना पत्राद्वारे केली.
भरणे यांनी निदर्शनास आणून दिले की, राज्यातील युरियाचा साठा सध्या फक्त २.३६ लाख मेट्रिक टन आहे. त्यामुळे आगामी रब्बी हंगामासाठी हा साठा अपुरा ठरणार असल्याचे स्पष्ट आहे.

अपेक्षित वाटप व अपुरा पुरवठा
• एप्रिल–जुलै २०२५ दरम्यान राज्याला केंद्राकडून १०.६७ लाख मेट्रिक टन युरियाचे वाटप अपेक्षित होते.
• प्रत्यक्षात फक्त ७९% म्हणजे ८.४१ लाख मेट्रिक टन पुरवठा झाला.
• ऑगस्ट महिन्यात २.७९ लाख मेट्रिक टन वाटपातील केवळ ०.९६ लाख मेट्रिक टनच मिळाले.
“हा तुटवडा भरून काढण्यासाठी केंद्राने तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे,” असे भरणे यांनी नमूद केले.
पेरणी क्षेत्र व वाढलेली मागणी
• खरीप हंगामातील पेरणी राज्यात ९८% पूर्ण झाली असून एकूण क्षेत्र १४४ लाख हेक्टर आहे.
• यंदा १४.३० लाख हेक्टरवर मक्याची पेरणी झाली असून, ही मागील वर्षाच्या तुलनेत ५४% जास्त आहे.
• कापूस, मका व इतर पिकांसाठी टॉप ड्रेसिंग डोसची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
कृषिमंत्री भरणे यांनी केंद्र सरकारकडे केलेल्या प्रमुख मागण्या:
1. ऑगस्ट महिन्यातील प्रलंबित युरिया वाटपाची तातडीने पूर्तता करावी.
2. प्रलंबित आयात पुरवठा उपलब्ध करून द्यावा.
3. ऑगस्ट–सप्टेंबरमधील पावसामुळे वाढलेल्या क्षेत्राचा विचार करून आगामी रब्बी हंगामासाठी १२ लाख मेट्रिक टन युरियाच्या प्रस्तावाला मंजुरी द्यावी.

