X : @milindmane70
महाड
“शासन आपल्या दारी” या कार्यक्रमासाठी रायगड जिल्ह्यातल्या नऊ आगारांमधून ७०० एसटी बसेस आरक्षित केल्या आहेत. या कार्यक्रमाला हजारो नागरिक उपस्थित राहणार आहेत. यामुळे एस.टी.बसेसचा तुटवडा जाणवणार असल्याने पंधरा तालुक्यातील प्रवाशांवर ५ जानेवारी रोजी पायी वारी करण्याची वेळ येणार आहे.
माणगाव तालुक्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उच्च व तंत्र शिक्षण विद्यापीठाच्या प्रांगणात हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, पनवेल, खालापूर, कर्जत, सुधागड, माणगाव, महाड, पोलादपूर, रोहा, मुरुड, म्हसळा, श्रीवर्धन, तळा व उरण या १५ तालुक्यातून एक लक्ष जनता उपस्थित राहण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्यासाठी एसटी महामंडळाच्या सातशे बसचा वापर करण्यात येणार आहे. या तालुक्यातून जनतेला आणण्यासाठी एसटी महामंडळाच्या रिकाम्या बसेस ४ जानेवारी रोजी म्हणजे आदल्या दिवशीच गावात वस्तीसाठी पाठवल्या जाणार आहेत. ५ जानेवारी रोजी पहाटे चार वाजेपासून नागरिकांना घेऊन या बसेस लोणेरे येथे निघणार आहेत.
कार्यक्रमासाठी पाठवण्यात येणाऱ्या काही एसटी बसेस आगारात नादुरुस्त आहेत, त्यांची दुरुस्ती करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. रायगड आगारातून बस उपलब्ध झाल्या नाहीत तर बाजूच्या जिल्ह्यातील आगारातून बसेस मागवण्याचे फर्मान राज्य शासनाकडून काढण्यात येणार आहे.
जनतेची होणार पायी वारी?
लोणेरे फाटा ते लोणेरे विद्यापीठ (कार्यक्रमाचे नियोजित स्थळ) हे अंतर तीन किलोमीटर असून या ठिकाणी जाणारा रस्ता अरुंद आहे. मंत्री, खासदार, आमदार, राज्य शासनाचे सचिव व प्रशासकीय अधिकारी तसेच येणाऱ्या व्हीआयपीसाठी असणारा पोलीस बंदोबस्त व सुरक्षारक्षक यांची देखील वाहने याच रस्त्यावरून जाणार आहे. त्यामुळे या मार्गावर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता एसटी बसेसमधील नागरिकांना लोणेरा फाटा येथून कार्यक्रम स्थळी पायी वारी करावी लागणार आहे.
 
								 
                                 
                         
                            
