महाड – रायगड जिल्ह्यातील राजकारणात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी शिंदे गटाच्या आमदार महेंद्र दळवी यांना चोख प्रत्युत्तर दिले.
देशमुख म्हणाले, “खासदार सुनील तटकरे हे १९९२ पासून रायगड जिल्ह्याच्या जनतेचे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांना वारंवार विजयी करून दिले आहे. ज्यांनी तटकरे साहेबांच्या पायाला हात लावून राजकारणात उभे राहिले, तेच आज त्यांच्यावर टीका करत आहेत. ही टीकेची मालिका कुठेतरी थांबवावी. अन्यथा भविष्यात याहून परखड शब्दांत उत्तर द्यावे लागेल.”
रोहा येथे आमदार दळवी यांनी केलेल्या टीकेवर बोलताना देशमुख म्हणाले, “हा डोंबाऱ्याचा खेळ थांबवला नाही, तर आमच्याकडे पुरेसा तथ्याधारित भंडार आहे. आम्हाला अलिबागच्या आमदारांच्या कौटुंबिक गोष्टींवर बोलायचे नाही, त्यांच्या पत्नीने दाखल केलेल्या ४९८ च्या खटल्यावर बोलायचे नाही, किंवा वीज वितरण कंपनीचे खांब चोरल्याच्या गुन्ह्यावरही बोलायचे नाही. पण जर वेळ आली, तर रोहेपुरतेच नव्हे तर अलिबागमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर द्यायला तयार आहे.”
देशमुखांनी पुढे इशारा दिला की, “अलिबागचे आमदार जर पुन्हा तटकरे साहेबांवर वैयक्तिक टीका करतील, तर त्यांना कठोर आणि तितक्याच परखड शब्दांत प्रत्युत्तर मिळेल.”