महाराष्ट्र ताज्या बातम्या

Raigad ZP: जिल्हा परिषदेवर सत्ता कुणाची येणार?

शेकापची घसरण, शिवसेनेतील फूट; राष्ट्रवादी-भाजपाच्या पथ्यावर पडणार का?

महाड: रायगड जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीत सत्ता कुणाच्या हाती जाणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती सत्तेत होती. मात्र, सध्या शेकापला लागलेली घरघर आणि शिवसेनेत झालेल्या फुटीमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) भाजपाशी हातमिळवणी करून पुन्हा जिल्हा परिषद ताब्यात घेण्याच्या तयारीत असल्याचे चित्र निवडणुकीपूर्वी स्पष्ट होत आहे.

लोकसभा- विधानसभा निवडणुकांमधील बदललेली समीकरणे

रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे विजयी झाले. तर मावळ लोकसभा मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांमधून (कर्जत-खालापूर, पनवेल, उरण) श्रीरंग बारणे विजयी झाले. मात्र विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील चित्र बदलले आणि शिवसेना (शिंदे गट) – ३ आमदार, भाजप – ३ आमदार आणि राष्ट्रवादी – १ आमदार असे एकूण ७ आमदार जिल्ह्यातून निवडून आले.

यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपाचे निरंजन डावखरे, कोकण शिक्षक मतदारसंघातून शिंदे गटाचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विजय मिळवला. त्यानंतर शेकापमधून भाजपात प्रवेश केलेले माजी आमदार धैर्यशील पाटील यांना राज्यसभेवर खासदारकीची संधी मिळाली.

सत्तांतर आणि मंत्रिपदे

लोकसभा व विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता जाऊन महायुतीची सत्ता स्थापन झाली. यामध्ये रायगडच्या आदिती तटकरे यांना महिला व बालविकास मंत्रीपद, महाडचे भरत गोगावले यांना फलोत्पादन मंत्रीपद मिळाले.

दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात नसल्याने जिल्ह्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे वातावरण होते.

नगरपरिषद निवडणुकीत युतीचा प्रयोग

चार वर्षांनंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यात रायगडमधील १० नगरपरिषदांच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये काही ठिकाणी भाजप-शिंदे गट तर काही ठिकाणी भाजप-राष्ट्रवादी युती दिसून आली.

या १० नगरपरिषदांमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि शेकाप यांनी विविध ठिकाणी वर्चस्व प्रस्थापित केले. मात्र आता खरी राजकीय लढाई जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी होणार आहे.

मागील जिल्हा परिषदेचे चित्र

मागील पंचवार्षिक काळात राष्ट्रवादी काँग्रेस – १२ सदस्य, शेकाप – २३, शिवसेना – १८, काँग्रेस – ३ आणि भाजप – ३ असे संख्याबळ होते.

त्यावेळी आदिती तटकरे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या, तर  उपाध्यक्षपद शेकापकडे होते.

मात्र तेव्हा राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र होते. आज शिवसेनेत फूट पडल्याने शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटात मतांचे विभाजन होणार, हे स्पष्ट आहे. त्यामुळे शिंदे गटाला पूर्वीसारखे वर्चस्व राखणे कठीण जाणार आहे.

शेकापची घसरण

शेकापचा जिल्ह्यात एकही आमदार नसल्याने आणि संघटनात्मक कमकुवतपणा वाढल्याने, पुन्हा पूर्वीइतके संख्याबळ मिळवणे शेकापसाठी अवघड ठरेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

भाजप-राष्ट्रवादी आघाडी आघाडीवर?

राज्यात सत्तेत असलेल्या भाजपाचे रायगडमध्ये ३ आमदार, १ राज्यसभा खासदार, आणि १ पदवीधर मतदारसंघातील आमदार असल्याने भाजप पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहे. एक अंकी आकड्यांवरून दोन अंकी संख्याबळ गाठण्याचे भाजपाचे लक्ष्य आहे.

एकंदरीत, रायगड जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजप यांच्यात जोरदार चढाओढ होणार आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत राष्ट्रवादी-भाजप युती जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी पुरेसे संख्याबळ मिळवू शकते, असे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात