X: @therajkaran
राज ठाकरे यांची मनसैनिकांना भावनिक साद
मुंबई: शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्र नवंनिर्माण सेनेच्या ९ एप्रिल रोजीच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या निमित्ताने थेट एक्स या समाज माध्यमावर राज ठाकरे यांनी “मला आपल्याशी बोलायचे आहे” अशी काहीशी भावनिक साद मनसैनिकांना घातल्याने या दिवशी राज ठाकरे काय बोलणार याकडे तमाम मनसैनिकांसह येथील राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आपल्या अधिकृत हेंडलरवरून गुढीपाडव्याच्या मेळाव्याचा ट्रेलर लाँच केला. यात त्यांनी “९ तारखेला शिवतीर्थावर या, नक्की काय घडलंय, काय घडतंय हे मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचे आहे….!” अशा कॅप्शनसह हा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. त्यामुळेच राजकीय वर्तुळात यासंदर्भात कुतुहल निर्माण झाले आहे.
कुतुहल यासाठी की मराठी तरुणांना नोकऱ्या, मग मराठी पाट्यांचा आग्रह त्याचवेळी ज्वलंत हिंदुत्त्वाचा पुरस्कार, अशा एक एक पायऱ्या चढत लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याच्या आठ महिन्यांपासून या ना त्या कारणाने शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे व राज्यातील भाजपचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विविध कारणांखाली भेटीगाठी वाढवल्या होत्या. त्यामागे उद्देश एकच होता की यावेळी काहीही करून लोकसभेत चंचू प्रवेश करायचाच. अलीकडेच त्यांनी आपला सुपुत्र अमित ठाकरे याला सोबतीला घेऊन दिल्लीमध्ये भाजपचे नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेवून लोकसभा निवडणूका लढवण्यासंदर्भात अंतिम चाचपणीही केली होती. त्यामुळेच राज ठाकरे यांची मनसे महायुतीत सहभागी होण्याच्या चर्चांनाही उधाण आले होते. मात्र महायुतीतील शिवसेना, भाजप व अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात प्रत्यक्षात जागावाटप झाले. तीनही पक्षांचे उमेदवारही जाहीर झाले तरी मनसे सोबत युतीची घोषणा मूर्त स्वरूप घेताना दिसत नसल्याने राज ठाकरे यांनाही नेमकी काय भूमिका घ्यावी हे कळेनासे झाल्याने कदाचित ते आता मनसैनिकांचाच कौल घेतील व गुढीपाडव्यालाच मेळाव्यात त्याची घोषणा करतील असा राजकीय निरीक्षकांचां होरा आहे.