मुंबई
सर्वच पक्षांचं लक्ष आता २०२४ मध्ये होणाऱ्या पदवीधर मतदार निवडणुकांकडे लागले असून आज यासंबंधित झालेल्या मनसेच्या आढावा बैठकीत राज ठाकरे पदाधिकाऱ्यांवर संतापल्याचं वृत्त समोर आलं आहे.
वारंवार बैठकी होतात मात्र तरीही नोंदणी होत नसल्याचा सवाल करीत तयारीला लागण्यासंदर्भात राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.
तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाकडून मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार संघातून कोणाला संधी मिळणार याबाबत चर्चा सुरू झाली. दरम्यान शिवसेना सचिव वरुण सरदेसाई यांना मुंबई पदवीधर मतदारसंघातून उतरवणार असल्याचं सांगितलं जात आहे. कोकण मतदारसंघातून निरंजन डावखरे यांच्या विरोधात कोकणातील ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख आणि अनंत गीते यांचे विश्वासू किशोर जैन यांच्या नावाची वर्षी लागण्याची शक्यता आहे.
जून २०२४ मध्ये कोकण पदवीधर मतदार संघासाठी निवडणूक होणार आहे. दरम्यान मनसेनेही यात एन्ट्री घेतली असून यंदाच्या निवडणुकीत चुरस पाहायला मिळणार आहे. दुसरीकडे भाजपकडून कोकण पदवीधर मतदार संघासाठी सध्या याच विभागाचे प्रतिनिधित्व करीत असलेले निरंजन डावखरे यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र अद्याप उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. सर्वच पक्षांकडून मतदार नोंदणी सुरू करण्यात आली आहे. येत्या काही दिवसात पक्ष आपला उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे.