X : @NalawadeAnant
मुंबई – जनतेच्या पैशातून स्वतःचे ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा राज्यातील महिलांना आधी सुरक्षित ठेवा, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे MNS President Raj Thackeray) यांनी बुधवारी राज्य सरकारला खडे बोल सुनावले. मुख्यमंत्र्यांचाच जिल्हा सुरक्षित नसेल तर इतर ठिकाणची अवस्था काय असेल, असे सांगत ठाकरे यांनी अप्रत्यक्षरीत्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर थेट निशाणाही साधला.
बदलापूर येथील घटनेच्या (Badlapur incident) पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी एक्स समाज माध्यमावर पोस्ट करून सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले, बदलापूरमध्ये जी अत्यंत दुर्दैवी आणि भीषण घटना घडली, त्यावर मी काल म्हणालो होती की यावर कारवाई व्हायला इतका वेळ का लागला? या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) माझ्या महिला पदाधिकाऱ्यांनी वाचा फोडली आणि विषय लावून धरल्याने जनआक्रोशाला तोंड फुटले.
मुळात हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असून या जिल्ह्यातच जर कायदा धाब्यावर बसवला जात असेल तर बाकी ठिकाणची परिस्थिती काय असेल याची कल्पना पण करवत नाही, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
‘लाडकी बहीण’ योजनेच्याद्वारे (Ladki Bahin Yojna) सरकार आज स्वतःचे कौतुक करून घेण्यात मग्न आहे, पण जर तुमची बहीण खरंच लाडकी असेल तर तिच्यावर अशी वेळ येऊ नये आणि दुर्दैवाने आलीच तर तिला न्याय मिळेल हे पाहणं, हे पहिले कर्तव्य नाही का ? असा रोखठोक प्रश्नही ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना केला.
जनतेच्या पैशातून, बहिणींना पैसे देऊन, स्वतःचे ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे, ही भावना जरी निर्माण केलीत तरी खूप आहे. कारण माझ्या पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांमुळे हा विषय आज समोर आला याचा मला अभिमान असून मुळात असे प्रकार घडू नयेत, यासाठी कडक कायदे आणि त्याची अंमलबजावणी होणं गरजेचे असल्याचेही राज ठाकरे यांनी आवर्जून नमूद केले.