मुंबई:ऑगस्ट २०२५ मध्ये नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे व जमीनिचे नुकसान झाले. या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ₹५५३.८४ कोटींच्या मदत पॅकेजला अखेर शासनमान्यता देण्यात आली आहे.
मंत्री अनिल सावें यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे ७,९२,३४४ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, पिकांचे व जमीनिचे एकूण ₹५७४.२८ कोटींचे नुकसान झाल्याचा पंचनामा जिल्हाधिकाऱ्यांनी सादर केला होता. यावर मंत्री अनिल सावे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून शेतकऱ्यांना तातडीची मदत उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती.
या पत्रानंतर महसूल व वन विभागाने १८ सप्टेंबर २०२५ रोजी शासन निर्णय काढत नांदेड जिल्ह्यातील ७,०९,३३७ शेतकरी आणि ६,४८,४३३.२९ हेक्टर क्षेत्रासाठी ₹५५३.८४ कोटींच्या नुकसान भरपाईस मान्यता दिली.
या निर्णयामुळे नांदेड जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, शेतकऱ्यांच्या जीवनात काहीसा दिलासा निर्माण होईल, अशी अपेक्षा आहे.