मुंबई : राज्यात जुलै व ऑगस्ट २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या १९ लाख २२ हजार ९०९ शेतकऱ्यांच्या १५ लाख ४५ हजार २५० हेक्टरवरील शेतपिकाच्या नुकसानीपोटी एकूण ₹१,३३९ कोटी ४९ लाख २५ हजारांच्या मदतीस शासनमान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.
यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला असून, शेतकऱ्यांचे तातडीने पुनर्वसन व दिलासा मिळावा यासाठी ही मदत निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विभागनिहाय मंजूर मदत
अमरावती विभाग
अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील ७.८८ लाख शेतकरी व ६.५४ लाख हेक्टर क्षेत्र बाधित. नुकसान भरपाई म्हणून ₹५६५ कोटी ६० लाख ३० हजार मंजूर.
नागपूर विभाग
गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातील ३७,६३१ शेतकरी व २१,२२४ हेक्टर क्षेत्र बाधित. मंजूर मदत ₹२३ कोटी ८५ लाख २६ हजार.
पुणे विभाग
कोल्हापूर जिल्ह्यातील ३६,५५९ शेतकरी व ८,८३५ हेक्टर क्षेत्र बाधित. मंजूर मदत ₹१४ कोटी २८ लाख ५२ हजार.
छत्रपती संभाजीनगर विभाग
हिंगोली, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील १०.३५ लाख शेतकरी व ८.४८ लाख हेक्टर क्षेत्र बाधित. मंजूर मदत ₹७२१ कोटी ९७ लाख ८६ हजार.
नाशिक विभाग
नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव व अहिल्यानगर जिल्ह्यातील २४,६७७ शेतकरी व १२,१४९ हेक्टर क्षेत्र बाधित. मंजूर मदत ₹१३ कोटी ७७ लाख ३१ हजार.