मुंबई : पुराने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार ठोस योजना आणणार असून, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पूरग्रस्त भागांचा दौरा करून परतल्यावर या योजनेची घोषणा केली जाईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी मुंबईत पत्रकारांना दिली.
बावनकुळे म्हणाले की, राज्याचा जवळपास अर्धा भाग पूरग्रस्त झाला असून तातडीने मदत देण्याचे काम सुरू आहे. “महसूल अधिकाऱ्यांना अचूक पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
मदतीसाठी राज्यातील मोठ्या उद्योगगटांनी व कंपन्यांनी CSR फंडातून पुढे यावे, असे आवाहन करताना बावनकुळे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्री सध्या पूरग्रस्त भागात शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत. “दर तासाला मी स्वतःही परिस्थितीचा आढावा घेत असून महसूल यंत्रणेतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधत आहे,” असे त्यांनी सांगितले.
मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतजमीन वाहून गेली असून शेतकरी हतबल झाले आहेत. बावनकुळे म्हणाले, “राज्यात एखाद्या रस्त्याचे काम थांबले तरी चालेल, पण शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे असून त्यांच्या मोडलेल्या संसारांना पुन्हा उभे करण्यासाठी प्रयत्नशील आहे.”
या वेळी त्यांनी विरोधकांनाही आवाहन केले की, “शेतकरी संकटात असताना टीका किंवा राजकारण करून काही साध्य होणार नाही. सरकारला काही सूचना द्यायच्या असतील तर जरूर कराव्यात, पण सध्या ही मदतीची वेळ आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांना मदत करावी.”