By योगेश त्रिवेदी
मुंबई: राज्य सरकारच्या मंत्रालयात दीर्घ सेवा बजावून निवृत्त झालेल्या सुप्रिया सुभाष लाडे यांनी श्रीलंकेत झालेल्या मास्टर्स ॲथलेटिक्स स्पर्धेत ५००० मीटर वॉक (70 वर्षांवरील गटात) भारतासाठी खेळत अभूतपूर्व यश संपादन केले आहे. त्यांनी 55.29.8 मिनिटे वेळ नोंदवत कांस्य पदक पटकावले. त्यांच्या या विजयामुळे श्रीलंकेच्या स्टेडियमवर अभिमानाने तिरंगा फडकला.
सुप्रिया लाडे यांनी मंत्रालयातील महसूल, वन, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांमध्ये निम्न श्रेणी लघुलेखिका पदावरून फेब्रुवारी 2011 मध्ये सेवानिवृत्ती घेतली. मात्र निवृत्तीनंतरही त्यांनी आपली क्रीडाप्रेमी वृत्ती आणि मैदानावरील सक्रियता कायम ठेवली.
लाडे यांना शालेय जीवनापासूनच थ्रोबॉल, कबड्डी, खो-खो, १०० मीटर धावणे, गोळाफेक, लांबउडी अशा विविध क्रीडा प्रकारांची आवड होती. नागपूरहून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या मुंबईत मंत्रालयात रुजू झाल्या. सचिवालय जिमखाना स्पर्धांमध्ये त्यांनी संघासोबत आणि वैयक्तिक गटातही अनेक पारितोषिके पटकावली. महाविद्यालयीन काळात कामगार कल्याण केंद्रांतर्गत झालेल्या क्रीडा आणि नाट्यस्पर्धांमध्येही त्यांना अनेक बक्षिसे मिळाली होती. नाट्यस्पर्धेत प्रथम क्रमांकही त्यांनी पटकावला होता.
आजही त्या डोंबिवलीत नियमित सराव व व्यायाम करतात. वयाच्या ७०व्या वर्षानंतर आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदक मिळवणे ही केवळ वैयक्तिक यशाची गोष्ट नाही, तर इतर महिला कर्मचारी व समाजासाठीही प्रेरणादायी बाब आहे.
या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना सुप्रिया लाडे म्हणाल्या, “माझ्या मुलांनी, कुटुंबीयांनी आणि हितचिंतकांनी दिलेला पाठिंबा हेच माझ्या यशाचे खरे श्रेय आहे.”