X: @therajkaran
जवळपास दोन आठवडे चाललेल्या राजकीय नाट्यानंतर
पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज) (Pakistan Muslim League – Nawaz) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (Pakistan People’s Party -PPP) यांचे संयुक्त सरकार सत्तारूढ होणार हे आता नक्की झाले आहे. पाकिस्तान मुस्लिम लीगचे (नवाज) नेते शहाबाज शरीफ (Shehbaz Sharif) हे पंतप्रधान होतील, तर पीपीपीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो – झरदारी यांचे पिता आसिफ आली झरदारी (Asif Ali Zardari) हे राष्ट्रपती होतील, असे भाकीत जागतिक स्तरावर सर्वप्रथम The News 21 ने वर्तवले होते. ते आता तंतोतंत खरे होताना दिसते आहे.
या सगळ्या घडामोडींमध्ये पाकिस्तानात एक नवीन नेतृत्व उदयास येऊ घातले आहे. माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची 50 वर्षीय कन्या मरियम नवाज (Maryam Nawaz Sharif) यांची पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री म्हणून निवड झालेली आहे. त्या येत्या काही दिवसांत पदभार ग्रहण करतील. त्या पंजाब प्रांताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री (First woman Chief Minister of Punjab Province) असणार आहेत. पिता नवाज शरीफ आणि काका शहाबाज शरीफ यांच्यानंतर शरीफ घराण्यातील तिसरी व्यक्ती या पदावर विराजमान होणार आहे.
पित्याप्रमाणेच मरियम नवाज यादेखील वादग्रस्तच ठरल्या आहेत. शालेय शिक्षण पूर्ण करून महाविद्यालयीन जीवनाची सुरुवात करतानाच त्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या. त्यांची शैक्षणिक प्रगती समाधानकारक नसल्यामुळे लाहोरमधील (Lahore) एका प्रसिद्ध महाविद्यालयाने त्यांना प्रवेश देण्याचे नाकारले. त्यावेळी नवाज शरीफ पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री होते. आपल्या कन्येला प्रवेश नाकारल्याचे समजतात त्यांचा तीळपापड झाला आणि त्यांनी थेट त्या महाविद्यालयाच्या प्रधान आचार्यांनाच बरखास्त करून टाकले. नंतर विद्यार्थ्यांच्या रेट्यामुळे त्या प्राध्यापकांना परत सेवेत घेण्यात आले. तोवर मरियम नवाज यांची सगळीकडे छी थू झाली होती.
मरियम यांना खरेतर डॉक्टर व्हायचे होते. त्यांनी वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेशही घेतला होता. मात्र, शैक्षणिक प्रगती जेमतेम असल्यामुळे त्यांना वैद्यकीय शिक्षणही अर्धवट सोडून द्यावे लागले. त्यानंतर त्यांनी इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर पदवी घेतली. आपण पॉलिटिकल सायन्स (Political Science) या विषयात डॉक्टरेट मिळवली आहे, असा त्यांचा दावा आहे. त्यांच्या डॉक्टरेटचा प्रबंध आजवर कोणीही पाहिलेला नाही, हा भाग वेगळा.
पाकिस्तानी सैन्यातील अधिकारी सफदर अवान पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या व्यक्तिगत सुरक्षा संचात होते. मरियम नवाज त्यांच्या प्रेमात पडल्या आणि अवघ्या 19 व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. त्यांना दोन कन्या आणि एक पुत्र आहेत. मरियम यांची कन्या माहनूर हिच्या विवाहासाठी नवाज शरीफ यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Indian Prime Minister Narendra Modi) यांना आमंत्रित केले होते.
राजकारणात प्रवेश केल्यानंतर अवघ्या एका वर्षातच 2013 मध्ये मरियम तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या मंत्रिमंडळात युवा कल्याण खात्याच्या सल्लागार म्हणून काम करू लागल्या. त्यांची नियुक्ती बेकायदा असल्याची ओरड झाल्यानंतर लाहोर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतरही त्या पक्षात कार्यरत होत्या. मात्र, कधी वडिलांची संपत्ती दडवून ठेवल्याच्या आरोपावरून, तर कधी पाकिस्तान तेहरीक ए इंसाफ (Pakistan Tehreek-e-Insaf – PTI) या प्रतिस्पर्धी पक्षाच्या नेत्याची हत्या घडविण्याच्या आरोपावरून मरियम सातत्याने वादात आणि चर्चेत राहिल्या.
कनिष्ठ न्यायालयाने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात शिक्षा ठोठावयाची आणि मरियम यांनी ती उच्च न्यायालयातून रद्द करून आणायची असे तीनदा घडले.
नवाज शरीफ 2019 मध्ये लंडनला निघून गेले. त्यानंतर मरियम यांनी तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्याविरुद्ध मोर्चा उघडला. विरोधी पक्षांच्या आंदोलनाचे नेतृत्व त्यांनी केले आणि इम्रान खान यांच्यावर सातत्याने जहरी टीका केली. मरियम याच नवाज शरीफ यांच्या उत्तराधिकारी होतील हे त्यावेळी स्पष्ट झाले होते.
मरियम यांना प्रशासनाचा अनुभव मिळावा म्हणून त्यांना पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्रिपदी नेमण्यात आले आहे. मात्र, राजकारणात सगळेच डाव काही सरळमार्गी नसतात. मरियम यांचे चुलत बंधू आणि नियोजित पंतप्रधान शहाबाज शरीफ यांचे पुत्र हमझा यांच्याशी मरियम यांचे खटके उडू शकतात. मरियम यांनी आमदार म्हणून शपथ घेतली तेव्हा हमझा उपस्थित नव्हते. हमझा यांनी राष्ट्रीय राजकारणात रस घ्यावा आणि पंजाब प्रांताची सूत्रे मरियमकडे सोपवावी, असे शरीफ कुटुंबात ठरले आहे. हे सूत्र काही दिवस पाळले जाईल. कालांतराने मात्र शरीफ घराण्याचा राजकीय वारस कोण यावरून हमझा हे मरियम यांच्यापुढे आव्हान उभे करू शकतात.
मरियम यांचे प्रशासन सुरळीत चालावे यासाठी नवाज शरीफ यांनी आणखी एका मरियमची नियुक्ती केली आहे. त्यांच्या पक्षाच्या मुख्य प्रवक्त्या मरियम औरंगजेब (Marriyum Aurangzeb) या मरियम नवाज यांच्या सल्लागार म्हणून काम करणार आहेत. सामान्य कार्यकर्त्यांना मरियम नवाज यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मरियम औरंगजेब यांचा अडसर पार करावा लागणार आहे. मरियम औरंगजेब यांनी केंद्र सरकारमध्ये माहिती आणि प्रसारणमंत्री म्हणून काम केले आहे. त्या नवाज शरीफ यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. त्यांनी इंग्लंडमधून शिक्षण पूर्ण केले आहे. त्यामुळे त्या मरियम नवाज यांना योग्य तो सल्ला देऊ शकतात, असे शरीफ यांना वाटते.
नवाज शरीफ यांचे चौथ्यांदा पंतप्रधान होण्याचे स्वप्न भंगले आहे. त्यांचे बंधू शहाबाज पंतप्रधान होऊ घातले आहेत. अशावेळी नवाज शरीफ यांनी मरियम यांच्यावर फार मोठी जबाबदारी टाकली आहे. नवाज यांचा यांचा विश्वास मोडण्याचे परिणाम किती घातक होऊ शकतात हे चौधरी निसार अली खान या ज्येष्ठ नेत्याला चांगलेच ठाऊक आहे. त्यांनी नवाज शरीफ यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला आणि शरीफ यांनी त्यांना राजकारणातूनच संपवून टाकले. त्यामुळे मरियम नवाज यांच्या मार्गातील एकेक अडथळा नवाज शरीफ दूर करत राहणार हे नक्की. याचा अननुभवी मरियम यांना फायदा होतो की त्यांचे अंतर्गत शत्रू वाढत जातात हे बघणे तितकेच मनोरंजक असेल.