जालना
रविवारी मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केल्यानंतर थेट मुंबईला जायला निघाले होते. सलाईनमधून विष देऊन, एन्काऊंटर करुन किंवा उपोषणातून मला संपविण्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डाव होता. आपला बळीच घ्यायचा असेल तर आपणच फडणवीस यांच्या सागर बंगल्यात जाऊ आणि तेथे त्यांनी आपला बळी घ्यावा, सरकारने आपल्या बदनामीचं षडयंत्र रचल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. यानंतर ते मुंबईला जायला निघाले होते.
दरम्यान जरांगे पाटील आंतरवालीत दाखल झाले आहे. त्यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा बांधव आंतरवालीत दाखल झाले आहेत. मात्र उपस्थित मराठा बांधवांना घरी परतण्याचं आवाहन पाटलांकडून करण्यात आले असून यावर उद्या निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दुसरीकडे शांततेत धरणे आंदोलन सुरू ठेवा अशी विनंती त्यांनी मराठा बांधवांना केली आहे.
जालना प्रशासनाचा मोठा निर्णय
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केल्यानंतर पाटील थेट मुंबईच्या दिशेने निघाले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात थेट संचारबंदी लागू करण्याचे आदेश प्रशासनाने काढले आहेत. त्यामुळे या परिसरात आता मराठा आंदोलकांना मनाई असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. आम्हाला मुंबईकडे जाऊ द्यायचे नाही म्हणून संचारबंदी लावली आहे. त्यामागील कारण काय असाही सवाल मराठा बांधवांकडून उपस्थित केला जात आहे.