मुंबई
आज राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. आज सकाळी ११ वाजता विधान परिषद तर दुपारी १२ वाजता विधानसभेचे कामकाज सुरू होणार आहे. अधिवेशन पुढील पाच दिवस चालणार आहे. उद्या २७ फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात येईल.
दुपारी दोन वाजता सन 2024-25 या वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात येईल. अंतरिम अर्थसंकल्पात 1 एप्रिल 2024 ते 31 जुलै 2024 या चार महिन्यातील आवश्यक खर्चाची तरतूद केली जाईल. त्यात सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते, कर्जाचे हप्ते, व्याज तसेच लोकसभा निवडणुकीला लागणाऱ्या खर्चाचा समावेश आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लेखानुदान प्रस्ताव आणि लेखानुदान विनियोजन विधेयकाला मान्यता देण्यात येईल.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आंदोलन गाजणार?
राज्य सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देऊ केलं असून यावर मनोज जरांगे पाटील यांनी विरोध दर्शवला आहे. याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जीवे मारण्याचा प्रयत्न असल्याचाही आरोप पाटलांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आजच्या अधिवेशनावर त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
कोणत्या मुद्द्यांवरुन सरकारला घेरणार..
कांदा निर्यातबंदी, मराठा आरक्षण यासह भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात केलेले गोळीबार, माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांची हत्या, पुण्यात हजारो कोटींचा अंमली साठा या मुद्द्यांवरुन विरोधक सरकारची कोंडी करू शकतात.