जालना
मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर राज्यभरात आंदोलन तीव्र होण्याची शक्यता लक्षात घेऊन मराठवाड्यातील तीन जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या जिल्ह्यात पुढील १० तास इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. छं. संभाजीनगर विभागातील सर्व आगारातील एसटी बसची वाहतूक तात्पुरती बंद करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाने दिले आहेत. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात थेट संचारबंदी लागू करण्याचे आदेश प्रशासनाने काढले आहेत.
बीड-जालना सीमा सील
मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय स्थगित केल्यानंतर पुन्हा आंतरवाली सराटी गाठलं. यानंतर पोलिसांनी बीड, जालना जिल्ह्याची सीमा सील केली आहे. बीड जिल्ह्यात ३८ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे.
सागर बंगल्यासह भांबेरी गावात बंदोबस्त
मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक आरोप केल्यानंतर फडणवीसांच्या सागर बंगल्याबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील मुंबईत सागर बंगल्यावर जाण्यास निघाले होते. मात्र रात्री त्यांनी नमती भूमिका घेत भांबेरी या गावात राहण्याचा निर्णय घेतला. यानंतर आज सकाळी ते आंतरवाली सराटी येथे दाखल झाले आहेत. मात्र सागर बंगला हा सरकारी आहे, कोणीही सरकारी कामाने सागर बंगल्यावर येऊ शकतं. कोणाचीही अडवणूक नाही अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी जरांगे यांच्या आरोपांवर व्यक्त केली होती.