डोंबिवली : संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात राज ठाकरेंनी भाष्य केलं आहे. आमदार गणपत गायकवाड यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं असेल, याची सखोल चौकशी होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. कल्याण डोंबिवली दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी केलेल्या या भाष्यानं राज ठाकरेंचा रोख नेमका कुणाकडे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. यात स्थानिक राजकारणही असल्याची शक्यता नाकारता येणार नाही.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
राज ठाकरेंना या प्रकरणी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, आमदार गणपत गायकवाड यांनी इतक्या टोकाचं पाऊल का उचललं असेल, याच्या खोलात जायला हवं. एखादा माणूस पोलीस ठाण्यात जाऊन गोळीबार का करेल, हे तपासण्याची गरज असल्याचं राज म्हणाले. या माणसाची मानसिक स्थिती काय असेल, इतकं टोकाचं पाऊल का उचललं असेल, हे प्रकरण इथपर्यंत कुणी आणलं, याची सखोल चौकशी होण्याची गरज असल्याचं राज म्हणाले.
हे प्रकरण इथपर्यंत कुणी आणलं, या त्यांच्या वाक्यानं त्यांचा रोष नेमका कुणाकडे आहे, असा प्रश्न निर्माण करणारा आहे.
गणपत गायकवाड सध्या कुठे?
शिंदेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड गोळीबार प्रकरणी अटकेत असलेले भाजप आमदार गणपत गायकवाड हे सध्या तळोजा कारागृहात आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव न्यायालयीन कोठडीत असलेल्या गायकवाड आणि त्यांच्यासोबतच्या आरोपींना तिथं पाठवण्यात आलेलं आहे.
गायकवाडांचे काय आरोप?
गणपत गायकवाड यांना अटक झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले होते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत राज्यात केवळ गुन्हेगार जन्माला येतील, असं गायकवाड म्हणाले होते. एकनाथ शिंदेंनी आपले कोट्यवधी रुपये खाल्ले असा आरोपही गायकवाड यांनी केला होता. मुख्यमंत्री यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. मुख्यमंत्री आणि त्यांच्या पुत्रानं सगळीकडे भ्रष्टाचार केलेला आहे, असा आरोपही गायकवाड यांनी केला होता. शिवसेनेत गद्दारी केलेले शिंदे हे भाजपशीही गद्दारी करणार असल्याचं ते म्हणाले होते.
कल्याण लोकसभेत शिंदेंना एकटं पाडण्याचा भाजपा-मनसेचा प्रयत्न?
श्रीकांत शिंदे यांना कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपाचे आमदार गणपत गायकवाड आणि मनसेचे आमदार राजू पाटील हे विरोधक राहिलेले आहेत. विकासकामांपासून ते वागणुकीपर्यंत अनेक मुद्द्यांवर खासदारांच्या विरोधी भूमिका या दोन्ही आमदारांनी घेतलेली आहे. महेश गायकवाड गोळीबार प्रकरणानंतर पहिल्यांदाच राज ठाकरेंनी मनसेची भूमिका स्पष्ट केली. यावरुन कल्याणात शिंदेंना घेरण्यासाठी भाजपा-मनसे एकत्र आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हे ही वाचा – ‘अडचणीच्या काळात शरद पवारांना छत्रपती शिवरायांची आठवण, आता तुतारी मिळालीय तर…’, काय म्हणाले राज ठाकरे?