कल्याण : शरद पवारांनी आत्तापर्यंतच्या राजकारणात कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं नाही, मात्र आता अडचणीच्या काळात त्यांना रायगडावर जाऊन तुतारी फुंकावी लागते आहे, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. कल्याण-डोंबिवली दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत शरद पवारांवर निशाणा साधलाय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठं बंड झालं. पक्षाचा ताबा अजित पवारांना मिळाला, पक्षाचं नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांना मिळालं, अशा अडचणीच्या काळात शरद पवार यांना छत्रपती शिवाजी महारजांची आठवण झालेली आहे, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.
मुस्लीम मतांसाठी शिवरायांचे नाव घेत नव्हते-राज
आत्तापर्यंत शिवरायांचे नाव घेतले तर मुस्लीम मतं मिळणार नाहीत, असं शरद पवारांना वाटत होतं, अशी टीकाही राज ठाकरेंनी केली आहे. काही वर्षांपूर्वी शरद पवारांची मुलाखत राज ठाकरेंनी घेतली होती. त्यातही राज ठाकरे यांनी शरद पवार यांना छत्रपती शिवरयांचं नाव का घेत नाही, असा प्रश्न विचारला होता, याची आठवण राज ठाकरेंनी करुन दिली. त्यावेळी शरद पवारांनी या प्रश्नावर सोयिस्कर मौन बाळगलं होतं, असंही राज ठाकरे म्हणालेत. शिवछत्रपतींचं नाव घेतलं तर मुस्लिमांची मतं जातील, असं पवारांना वाटत होतं. आता अडचणीच्या काळात त्यांना रायगड आठवल्याचं राज म्हणालेत.
तुतारी मिळालीये ती आता फुंका
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला तुतारी चिन्ह मिळालंय. या तुतारीचं लाँचिंग आज रायगडावर करण्यात आलं. या कार्यक्रमाला शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते. आता ही तुतारी मिळाली आहे, ती फुंका असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला आहे.
राजकारणाचा चिखल थांबला पाहिजे
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राजकीय चिखलफेक सुरु आहे, असं राजकीय वातावरण यापूर्वी कधीही राज्यात पाहिलं नव्हतं, अशी खंतही राज ठाकरेंनी व्यक्त केली. हे सगळं थांबलं पाहिजे, या राजकीय नेत्यांना वठणीवर आणण्याची गरज असल्याचं राज म्हणाले. लोकांनी यांना वठणीवर आणलं नाही तर महाराष्ट्रात आणखी चिखल होईल, असं भाकितही राज ठाकरेंनी वर्तवलंय.
भाजपसोबतच्या युतीच्या चर्चांना पूर्णविराम?
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपासोबत मनसेची युती होईल, अशी जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. या चर्चेवरही राज ठाकरेंनी उत्तर दिलं. एखाद्या व्यासपीठावर पाहिले म्हणजे युती आणि आघाडी होत नसते, असं सांगत त्यांनी चर्चामध्ये फारसं तथ्य नसल्याचे संकेत दिले. लोकसभा आणि विधानसभेत उमेदवार उभे करण्याबाबत मनसेकडून चाचपणी करण्यात येत असल्याचंही राज यांनी सांगितलंय.