मुंबई –राजकारणात मुद्दे सतत बदलत असले तरी गुरुवारी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेने एकाच वेळी अनेक विषयांवर स्फोटक आरोप करत सरकारला कोंडीत पकडले. सिडकोतील ५ हजार कोटींचा घोटाळा, नवी मुंबई एपीएमसीचा पुनर्विकास, रायगड टाऊनशीप, मराठा आंदोलन, आरक्षण आणि शिवसेनेचे राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांच्या वादग्रस्त पत्रावरून थेट फडणवीसांवर टीका — या सर्व आघाड्यांवर पवारांनी सरकारला लक्ष्य केले.
पवार म्हणाले, “सिडकोचे तत्कालीन अध्यक्ष असताना विद्यमान सरकारमधील मंत्री संजय शिरसाट यांनी ५ हजार कोटींचा घोटाळा केला. आम्ही पुरावे दिले, पत्रकार परिषदा घेतल्या, सुप्रीम कोर्ट समितीनेही दखल घेतली, तरीही सरकारकडून फक्त पुरावे मागवले गेले. नगरविकास विभागानेही माहिती दिली नाही. अजूनही कारवाई झालेली नाही.”
एपीएमसीच्या पुनर्विकासावर टीका करताना पवारांनी आरोप केला की, “प्रश्नपत्रिका लिहिणारा स्वतःच उत्तर देतो आणि निकालही जाहीर करतो. स्वतःचीच नियुक्ती स्वतः करून घेतली जाते. प्रशासक बनण्यासाठी रस्सीखेच का सुरू आहे? कित्येक कोटींची जमीन काही लाखांत विकली जातेय. हे सरकार खरोखरच ‘पॉकेटमार’ आहे.”
रायगड टाऊनशीपच्या संदर्भात पवार म्हणाले, “आपला देश सर्वधर्म समभाव मानतो. पण धार्मिक टाऊनशीप उभारणे म्हणजे थेट ध्रुवीकरण आहे. शासनाने यावर तातडीने कारवाई केली पाहिजे.”
मराठा आंदोलनावर बोलताना त्यांनी सरकारला नियोजनाच्या अभावाबद्दल दोष दिला. “सरकारकडे माहिती असूनही नियोजन केलं नाही. आम्ही आंदोलनात केलेली मदत ही माणुसकीच्या नात्याने केली. मात्र संजय राऊत यांचं राजकीय टार्गेट दुसरं कुणीतरी आहे,” असा टोला पवारांनी लगावला.
आरक्षणाच्या मुद्यावर ते म्हणाले, “जे दोन वर्षांपूर्वी करायला हवे होते ते आता निवडणुकीआधी करत आहेत. दोन्ही समित्यांवर भाजपचे वर्चस्व आहे. तीनही सत्ताधारी पक्ष एका कागदावर नाहीत. फक्त राजकीय खेळ आणि एकमेकांचे कपडे काढण्यात व्यस्त आहेत. चाणक्यनीतीच्या नादात सामान्यांचे नुकसान झाले.”
शेवटी, शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा यांच्या पत्राचा उल्लेख करत पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांनाही लक्ष्य केले. “देवरा मोठ्या कुटुंबातून आहेत. त्यांना सामान्यांच्या घरात काय चाललं आहे, हे माहीत नाही. एक मात्र नक्की – शिंदे साहेब देवरांच्या मदतीने फडणवीसांचे कपडे काढत आहेत,” अशी उपरोधिक टीका करून रोहित पवारांनी पत्रकार परिषद गाजवली.
रोहित पवारांच्या या आक्रमक हल्लाबोलमुळे राज्याच्या राजकारणात नवे वादळ उठण्याची शक्यता असून, पुढे सरकारची भूमिका काय असणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.