‘योकी ग्रीन एनर्जी’सह कराराने सरकारच्या ड्यू डिलिजन्सवर प्रश्नचिन्ह
By विक्रांत पाटील
मुंबई: स्वित्झर्लंडमधील दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक मंचात महाराष्ट्र सरकारने ‘महाराष्ट्रात गुंतवणुकीचा महापूर’ आल्याचा दावा करत विविध सामंजस्य करारांची घोषणा केली. याच घोषणांमध्ये Yoki Green Energy Private Limited या कंपनीसोबत ₹4,000 कोटींचा सामंजस्य करार झाल्याचे जाहीर करण्यात आले. या करारातून नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात मोठे प्रकल्प उभारले जातील आणि सुमारे 6,000 रोजगार निर्माण होतील, असे सांगण्यात आले.
मात्र, या घोषणेनंतर उपलब्ध झालेल्या सार्वजनिक कागदपत्रे आणि अधिकृत नोंदी पाहिल्यास, या कराराशी संबंधित कंपनीची आर्थिक क्षमता, उद्योग स्वरूप आणि अनुभवाबाबत गंभीर विसंगती समोर येतात.
Yoki Green Energy Private Limited ही कंपनी 14 जुलै 2022 रोजी नोंदणीकृत झाली आहे. म्हणजेच दावोस येथे जाहीर करण्यात आलेल्या ₹4,000 कोटींच्या सामंजस्य कराराच्या अवघ्या दीड वर्ष आधी कंपनी अस्तित्वात आली. कंपनीचा कॉर्पोरेट ओळख क्रमांक U23100MH2022PTC386729 असा आहे आणि ती खाजगी, गैर-सरकारी स्वरूपाची आहे. सार्वजनिक डेटाबेसनुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय कांदिवली पश्चिम, मुंबई येथे दाखवले आहे. मात्र Tracxn आणि Neusource या व्यावसायिक माहिती स्रोतांमध्ये पत्त्याबाबत वेगवेगळी नोंद आढळते.
कंपनीच्या आर्थिक स्थितीकडे पाहिले असता, अधिकृत भागभांडवल ₹10 लाख इतके आहे. भरलेले भागभांडवल काही स्रोतांनुसार ₹1 लाख, तर काही नोंदींमध्ये ₹1.22 लाख दाखवण्यात आले आहे. आर्थिक वर्ष 2024–25 साठी कंपनीचा महसूल सुमारे ₹9.37 लाख असल्याची नोंद सार्वजनिक डेटाबेसमध्ये उपलब्ध आहे. याच कंपनीसोबत राज्य सरकारने ₹4,000 कोटींचा सामंजस्य करार केल्याची घोषणा दावोस येथे करण्यात आली.
कंपनीच्या व्यवसाय स्वरूपाबाबतही अधिकृत नोंदी परस्परविरोधी माहिती देतात. Tracxn आणि MCA संबंधित डेटाबेसनुसार कंपनीचा प्रमुख उद्योग ‘Manufacture of Coke Oven Products’ असा नोंदवण्यात आला आहे. काही इतर व्यावसायिक माहिती स्रोतांमध्ये कंपनीचे कार्य उत्पादन, धातू आणि रसायनांशी संबंधित असल्याचे नमूद आहे. काही अहवालांनुसार पालघर जिल्ह्यातील पळसई येथे 120 केएलपीडी क्षमतेची धान्य-आधारित डिस्टिलरी आणि 3 मेगावॅट क्षमतेचा कॅप्टिव्ह वीज प्रकल्प उभारण्याची योजना कंपनीकडे आहे.
याउलट, दावोस येथे जाहीर करण्यात आलेल्या सामंजस्य करारात कंपनीकडून सौर व पवन ऊर्जेतील नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. सार्वजनिक नोंदींमध्ये उपलब्ध असलेल्या उद्योग वर्गीकरण आणि दावोस घोषणेमधील प्रकल्प स्वरूप यामध्ये स्पष्ट फरक दिसून येतो.
कंपनीच्या संचालक मंडळाबाबतही वेगवेगळ्या अधिकृत स्रोतांमध्ये भिन्न माहिती आढळते. IndiaFilings या पोर्टलनुसार सत्यजीत सुधीर तांबे, सोमेश्वर सूर्यभान दिवटे आणि अमित भागवत पवार ही नावे संचालक म्हणून नोंदवण्यात आली आहेत. मात्र MEFCOM Capital Markets Limited या भांडवली बाजारातील कंपनीच्या वार्षिक अहवालात समीर राजेंद्र पुरोहित यांचे नाव Yoki Green Energy Private Limited चे संचालक म्हणून नमूद आहे.
दावोस येथे झालेल्या ₹4,000 कोटींच्या सामंजस्य कराराच्या पार्श्वभूमीवर, कंपनीची आर्थिक क्षमता, उद्योग अनुभव, प्रकल्प अंमलबजावणीची तयारी आणि करारापूर्वी करण्यात आलेल्या तपासणी प्रक्रियेबाबत सरकारकडून अधिकृत माहिती देण्यात येणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.
दरम्यान, राजकारण कडून संपर्क साधल्यानंतर सत्यजीत तांबे यांनी स्वतः संपर्क केला. त्यांनी सांगितले की ते स्टार्टअप्सना प्रोत्साहन देतात आणि तरुण उद्योजकांना बीज भांडवल (seed funding) पुरवतात. त्यांनी स्पष्ट केले की सदर कंपनीची सुरुवात त्यांनी 2021 मध्ये केली होती; मात्र ते आता योकी ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक नाहीत.
तांबे यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी सुमारे पाच ते सहा महिन्यांपूर्वी संचालकपदाचा राजीनामा दिला आहे, मात्र अचूक राजीनामा दिनांक तत्काळ आठवत नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, ते दावोसला गेले नव्हते आणि जागतिक आर्थिक मंचात जाहीर करण्यात आलेल्या सामंजस्य कराराच्या स्वाक्षरी प्रक्रियेत त्यांचा कोणताही सहभाग नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सध्या ही कंपनी तरुण उद्योजकांकडून चालवली जात असून, त्यांनी परदेशी गुंतवणूकदारांकडून थेट परकीय गुंतवणूक (FDI) मिळवली असल्याचे तांबे यांनी सांगितले.


Porn Tude
January 24, 2026How are you?