अजित पवारांच्या धमक्यांचा उल्लेख सामानाच्या अग्रलेखातून
X: @therajkaran
मुंबई: अजित पवार (Ajit Pawar) मतदारांना खुलेआम धमक्या देऊ लागले असून बायकोला मते दिली नाहीत तर, इंदापूरला (Indapur) पाणी मिळणार नाही, अशी धमकी त्यांनी तेथील शेतकऱ्यांना दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे एक नंबरचे भ्रष्ट आणि घोटाळेबाज असून त्यांची जागा तुरुंगात असल्याची डरकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) वगैरे जाणकारांनी फोडली होती. त्यामुळे तुरुंगवारी वाचविण्यासाठी अजित पवार हे मोदी-फडणवीस भजन मंडळात सामील झाले असल्याची टिका सामानाच्या अग्रलेखातून करण्यात आली.
बारामतीतील उद्योजक, लहान व्यापारी यांना अजित पवार यांनी धमकावले की, ’जास्त उड्या माराल तर याद राखा. नाक दाबून तोंड कसे उघडायचे ते आपल्याला चांगले समजते, यावर टिका करण्यात आली आहे. हे दादा वगैरे नसून डरपोक, पळपुटे असल्याची टिका अजित पवार यांच्यावर करण्यात आली आहे. डरपोक लोकच धमक्या देऊन मस्तवालपणा दाखवतात. अजित पवार तेच करीत आहेत. त्यांचे राजकारणातील स्वकर्तृत्व शून्य आहे, हे त्यांना ४ जूनच्या निकालानंतर कळेल. आपणच महाराष्ट्राचे विकास पुरुष असून बारामतीसह सर्व राज्याचा विकास फक्त ’मी‘ म्हणजे ’मीच‘ केला. शरद पवार वगैरे सर्व झूठ असल्याचे ते बोलत आहेत. पण जरंडेश्वर कारखाना, शिखर बँक घोटाळा, सिंचन घोटाळा आणि त्यांच्याबरोबरच्या डरपोक सहकाऱ्यांचे कोट्यवधींचे घोटाळे म्हणजेच विकास काय? हा प्रश्न जनतेने त्यांना विचारायला हवा, असे या अग्रलेखात म्हटले आहे. तसेच सत्ता आणि सरकारी संरक्षण नसेल तर अजित पवारांसारख्या लोकांची अवस्था पाण्याविना तडफडणाऱ्या माशासारखी होईल. विरोधी पक्षनेता असलेला माणूस पलटी मारतो. सरकारात घुसतो हे लोकशाहीसाठी भयंकर कृत्य असल्याचे म्हटले आहे.
कुणाला किती निधी द्यायचा हे माझ्याच हातात असून त्यामुळे विकासासाठी भरपूर निधी हवा असेल तर माझ्याच बायकोला मते द्या. मी वाढपी आहे. कुणाला किती वाढायचे ते माझ्या हातात आहे, म्हणून सगळ्यांनी वाढप्याच्या पक्षात यावे. असे उघडपणे बोलणाऱ्या अजित पवार यांच्या हकालपट्टीची सुचना निवडणूक आयोगाने द्यावी. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा असेही या लेखात म्हटले आहे.