X: @therajkaran
पालघर: जिजाऊ विकास पार्टीचे सर्वेसर्वा निलेश सांबरे यांनी अपक्ष उमेदवारी बरोबरच भारतीय काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरला आहे. काँग्रेस पक्षाकडून एबी फॉर्म मिळाला तर त्याचे स्वागत करू असे सांगून भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या भाजपचे कपिल पाटील आणि महाविकास आघाडीच्या सुरेश गोपीनाथ म्हात्रे (बाळ्या मामा) या उमेदवारांसमोर तगडे आव्हान उभे केले आहे.
नामांकन दाखल केल्यावर सांबरे म्हणाले, काँग्रेसकडून माझी उमेदवारी ठरली होती, पण कुणीतरी सुपारी घेऊन बिचाऱ्या बाळ्या मामाचा बकरा बनवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांचं या मतदारसंघात अस्तित्व नाही. काँग्रेसचे नगरसेवक पळवलेले आणि जिल्हाध्यक्ष ही काँग्रेस पक्षाचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांचं या लोकसभा मतदारसंघात काहीच अस्तित्व नाही.
ते पुढे म्हणाले, याच भिवंडी लोकसभा मतदारसंघातून बॅरिस्टर अंतुले यांना त्रास दिला गेला. तसेच कुणबी सेनेचे विश्वनाथ पाटील यांना फसवल गेलं, आणि गोटीराम पवार, किसन कथोरे यांना मंत्रीपदापासून वंचित ठेवलं गेलं असा आरोप त्यांनी यावेळी केला.
या लोकसभा मतदारसंघातील वाडा, शहापूर, मुरबाड या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाची दयनीय अवस्था आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघात एकही मेडिकल कॉलेज नाही, अशी वाईट परिस्थिती आहे, आयटी पार्क नाही, भिवंडीतील लुमबाबत सकारात्मक निर्णय होत नाही, जसा सुरतला टेक्स्टाइल पार्क आहे, तसा येथेही झाला पाहिजे. उपनगरीय रेल्वे सेवा कर्जत, कसारा लोकल वाढल्या नाहीत. याकडे कुठलाही पक्ष लक्ष देत नाही, असा आरोप त्यांनी यावेळी केला.