महाराष्ट्र ताज्या बातम्या

Sahitya Sammelan: ‘आयुष्यात जे घडतं त्याला मीच कारणीभूत असतो’ – अमोल पालेकर

सातारा: छत्रपती शाहू महाराज साहित्य नगरीत सुरू असलेल्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रसिद्ध नाट्य-सिने अभिनेते व दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी आपल्या जीवनप्रवासावर स्पष्ट आणि आत्मपरीक्षणात्मक भूमिका मांडली. “आयुष्यात जे काही घडतं, त्याला मीच कारणीभूत असतो, असा माझा ठाम विश्वास आहे,” असे सुस्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले.

पालेकर यांच्या ‘ऐवज – एक स्मृतीबंध’ या आत्मचरित्रपर पुस्तकावर आयोजित पुस्तक चर्चेत ते सहभागी झाले होते. या चर्चेत संध्या गोखले आणि वृंदा भार्गवे यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून त्यांना बोलते केले.

चित्रकार ते प्रयोगशील रंगकर्मी – प्रवासाची उकल

अमोल पालेकर यांनी अमूर्त चित्रकारापासून प्रयोगशील रंगभूमीवर धडपडणाऱ्या तरुण रंगकर्मीपर्यंतचा प्रवास उलगडला. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या वैभवशाली काळातही स्वतःचा वेगळा आणि ठळक ठसा त्यांनी कसा उमटवला, याची आठवण त्यांनी सांगितली. त्या काळातील दिग्गज साहित्यिक, हिंदी-मराठी नाट्यसृष्टीतील महान अभिनेते यांच्याशी झालेल्या संवादांचे संदर्भही त्यांनी दिले.

“त्या दिग्गजांनी मला भरभरून दिले; त्यामुळेच प्रश्न विचारण्याची आणि विरोध करण्याची शक्ती मिळाली,” असे पालेकर म्हणाले.

स्मरणरंजन नव्हे, विरोध आवश्यक

या आठवणी केवळ स्मरणरंजनासाठी नसून, विरोध हा आवश्यक असतो, असे ते म्हणाले. काळा रंग काहींना का आवडत नाही, आणि जर तो मूक निषेधाचे प्रतीक असेल, तर तसा निषेध व्यक्त करू द्यावा, अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली.
संमेलनस्थळी काळे कपडे परिधान केल्यामुळे एका साहित्यिकाला रोखण्यात आल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर हे मत त्यांनी मांडले.

यशात अडकून राहणे मला मान्य नाही

“गोलमाल चित्रपट शंभर-शंभर वेळा पाहिल्याचे अनेक जण सांगतात; पण तिथेच अडकून राहणे मला आवडत नाही,” असे सांगत त्यांनी स्वतःची भूमिका स्पष्ट केली. स्वतःची सतत चाचपणी करणे, त्रुटी शोधणे आणि पुढे जाणे हेच आपल्याला आवडते, असे ते म्हणाले.
“आयुष्याकडे त्रयस्थ, दूरस्थपणे पाहणार नसू, तर जगण्यातली मजा कुठे उरते?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

प्रतिमेपलीकडचा अभिनेता

लोकांना फक्त ‘मोगॅम्बो खुश हुआ’ म्हणणारा अमरीश पुरी माहिती आहे; मात्र ‘हरवदन’सारख्या नाटकातील त्यांचा अप्रतिम अभिनय दुर्लक्षित राहिला, अशी खंत पालेकर यांनी व्यक्त केली.

सत्तरच्या दशकातील समांतर रंगभूमीच्या काळातील नाट्यनिर्मिती, तसेच गरज भासल्यास माध्यमांतर का आवश्यक असते, यावरही त्यांनी आपले विचार मांडले. “ब्रँड बनायचे नव्हते, म्हणून खलनायकाच्या भूमिका देखील स्वीकारल्या,” असे ते म्हणाले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात