Twitter : @Rav2Sachin
मुंबई :
सामाजिक भान असलेला कलाकार हा निसर्गसारखा नवनिर्मिती करणारा सुप्त स्वभावी आणि तितकाच मूक निरीक्षक हि असतो. त्याचे निसर्गाशी असलेले अतूट नाते त्याच्या निर्मितीची प्रेरणा आहे. मानवी समाजाच्या स्वास्थ्यासाठी पर्यावरण आणि औद्योगिक प्रगती यांची योग्य सांगड घालून निसर्गाशी संवाद साधला तर आपले सर्वांचे जीवन आनंदी होईल. कलाकार हे निसर्ग व रसिक यांना त्यांच्या निर्मितीच्या व कलाकृतीच्या माध्यमातून निखळ सौंदर्यानुभूती देण्याचं काम करत असतात याच पद्धतीने सह्याद्रीच्या पठारावरील निसर्ग सौन्दर्याची अनुभूती चित्रांच्या माध्यमातून प्रकट करण्याचे कार्य प्रा. विश्वनाथ साबळे (Prof Vishwanath Sable) यांनी केले आहे.
सर जेजे स्कुल ऑफ आर्टचे (J J School of Art, Mumbai) अधिष्ठाता असलेले प्रा. साबळे यांच्या “सह्याद्री – द नरेशन ऑफ लाईफ” हे चित्र प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये (Jehangir Art Gallery) दिनांक 28 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीमध्ये भरत आहे. प्रा. साबळे हे गेली 30 वर्ष सातत्याने चित्र निर्मिती करत आहे. निसर्ग ही त्यांची प्रेरणा राहिली आहे. उन्हाळ्यात विपरीत परिस्थिती असताना पांगारा, पळस, काटेसावर, बहावा इत्यादी झाडांना सुंदर फुलं कशी येतात यापासून प्रेरित होऊन त्यांनी ‘समर’ ही चित्रमालिक रंगविली.
मागील आठ ते दहा वर्षांपासून ते सह्याद्रीच्या पर्वत रांगेमध्ये असलेले विविध आकाराचे पर्वत, किल्ले, लेणी, घाट यांच्यावर आधारित चित्र निर्मिती करत आहेत. जहांगीर आर्ट गॅलरी येथे भरणाऱ्या चित्र प्रदर्शनामध्ये त्यांनी भीमाशंकर, आहुफे, नाणेघाट, माळशेज घाट, शिवनेरी, हरिश्चंद्रगड, लेण्याद्री या परिसरातील निसर्ग अनुभूती चित्ररूपात व्यक्त केली आहे. मुळचे ते भीमाशंकर परिसरातील असल्यामुळे येतील निसर्गाशी त्यांचे भावनिक नाते जुळलेले आहे. त्याचेच प्रतिबिंब त्यांच्या चित्रांमध्ये दिसून येते आहे.
येथील झाडांच्या खोडांचे विविध आकार, त्यावरील पोत, झाडाची मुळे व फांद्यांचे आकार व त्यापासून निर्माण झालेले आकृतिबंध त्यांच्या चित्रांचे भाग झाले आहेत. येथील डोंगरांची रचना वैशिष्ठयपूर्ण आहे. किल्ले व डोंगरांचे उंच सुळके, प्रचंड मोठे कडे, दगडांचे विविध आकार, त्यांचे रंग व पोत यामुळे ते प्रेरित झाले आहेत. या भागातील भटकंती आहि त्यातून मिळणारी सुंदर अनुभूती त्यांच्या सध्याच्या चित्रमालिकेतून दिसून येते.
त्यांच्या मते निसर्गाची सुंदर अनुभूती चित्रित करण्यासाठी जलरंग हे उत्तम माध्यम आहे. निसर्गाचा जिवंतपणा हा जलरंगातून व्यक्त करताना त्यांना जास्त आवडतो. या प्रदर्शनाच्या निमित्ताने त्यांचा अभ्यास व अनुभव व्यक्त करण्याचा प्रयत्न होत असला तरी निसर्गाबद्दलचे प्रेम आणि त्यातील जबाबदारी प्रदर्शन पाहता – पाहता नकळतपणे आपल्या आतल्या निसर्गालाही पुन्हा नवी पालवी फुटत असल्याचे जाणवते.
“निसर्गाच्या सानिध्यात मी निसर्गाचाच भाग होऊन जातो.. ही जाणीव मला जगायला उत्साह आणि ऊर्जा देत राहते. त्याचबरोबर वास्तवाचं भान ठेवत एक आदर्शवादी दृष्टीही देत राहते. त्यामुळे निसर्गातून मिळणारा आनंद व ऊर्जा माझ्या स्वभावानुसार कधी जलरंग तर काही ठिकाणी ऐक्रेलिकसारख्या माध्यमातून चित्रित करण्याचा प्रयत्न केला आहे,” असे विश्वनाथ साबळे आवर्जून नमूद करतात. त्यांच्या या प्रयत्नात आपल्यालाही आपला निसर्गही बहरलेला जाणवेल, एक वेगळा दृष्य अनुभव नक्की मिळेल. हे चित्रप्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी येथे दिनांक 28 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीत भरत असून सकाळी 11 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सर्वांसाठी पाहता येईल.