लेखक – हेमंत रणपिसे (प्रसिद्धी प्रमुख, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले))
भारतीय दलित पँथरच्या जोशपूर्ण घोषणा आणि आक्रमक नेतृत्वाने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासात आपले नाव कोरणारे रामदास आठवले हे आजही संघर्षाचे दुसरे नाव मानले जातात. ‘हर जोर जुल्म की टक्कर मे संघर्ष हमारा नारा है’ या घोषणेने भारावलेल्या तरुणांना पँथर बनविण्याचे कार्य त्यांनी केले. दलित अत्याचार, अन्याय आणि शोषणाविरोधात बुलंद आवाज बनून उभे राहणारे आठवले हे खऱ्या अर्थाने दलित बहुजनांचे संघर्षनायक आहेत.
दलित पँथरचे आक्रमक नेतृत्व
आठवले यांच्या नेतृत्वाखाली भारतीय दलित पँथरने ‘पोटात तुझ्या पेटली आग, उठ दलिता तोफा डाग’ असे आवाहन करत महाराष्ट्रभर आंबेडकरी युवकांना एकत्र आणले. ‘जय भीम के नारे पे खून बहे तो बहने दो’ या जोशपूर्ण घोषणांनी अन्यायाविरोधात संघर्ष करण्याची प्रेरणा दिली.
नामांतर लढ्यातील अग्रणी भूमिका
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यासाठी झालेल्या नामांतर आंदोलनात आठवले यांनी प्राणाची बाजी लावली. ‘लाठी गोली खायेंगे फिर भी आगे जायेंगे’ म्हणत त्यांनी पोलिसांचा लाठीमार सहन केला आणि तुरुंगवास भोगला. या संघर्षातून आठवलेंचे नेतृत्व अधिक प्रबळ झाले आणि त्यांचे नाव आंबेडकरी चळवळीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पुनर्जन्म
१९९० मध्ये आठवलेंनी भारतीय दलित पँथर बरखास्त करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आधारित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) काम सुरू केले. काँग्रेसला पाठिंबा देत त्यांनी विधानसभा निवडणुका लढवल्या आणि आंबेडकरी समाजाचे मोठे मतदान काँग्रेसच्या पारड्यात टाकले. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी काँग्रेसच्या ३५ जागा आठवलेंच्या पाठिंब्यामुळे जिंकल्या असल्याची कबुली दिली.
राजकीय पुढारी ते केंद्रीय मंत्री
आठवलेंनी महाराष्ट्रात पाच वर्षे कॅबिनेट मंत्रिपद भूषवले. त्यांनी धारावी-दादर आणि पंढरपूरमधून तीन वेळा लोकसभा निवडणुका जिंकल्या. २०१४ मध्ये ते बिनविरोध राज्यसभेवर गेले आणि २०१६ मध्ये पहिल्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळात सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून रुजू झाले.
भीमशक्ती-शिवशक्तीची एकजूट
रामदास आठवलेंनी महाराष्ट्रात शिवशक्ती-भीमशक्तीची एकजूट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. सवर्णांना आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची मागणी करून त्यांनी दलित-सवर्ण ऐक्य घडवून आणले.
अंतरराष्ट्रीय पातळीवरील नेतृत्व
आठवले यांची निवड ‘वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट’ या आंतरराष्ट्रीय बौद्ध संघटनेच्या जागतिक उपाध्यक्षपदी झाली. त्यांनी ‘दि पिपल्स एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्षपदही भूषवले.
संघर्षदिन म्हणून वाढदिवसाचा उत्सव
२५ डिसेंबर हा आठवले यांचा वाढदिवस संपूर्ण देशभर ‘संघर्ष दिन’ म्हणून साजरा केला जातो. लोकांच्या समस्या समजून घेणारे आणि त्यांच्या दुःखात सहभागी होणारे आठवले कार्यकर्त्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. “संघर्ष, संयम आणि धैर्याचे प्रतीक” म्हणून त्यांची ओळख आहे.
संघर्षनायक रामदास आठवले यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो ही मनःपूर्वक शुभेच्छा! जयभीम!