मुंबई: मुंबई महानगरपालिकेने पाणीपट्टीत ८% दरवाढ करण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयामुळे सर्वसामान्य मुंबईकरांवर आर्थिक ताण पडणार आहे. जलशुद्धीकरणाच्या नावाखाली नागरिकांना आर्थिक संकटात लोटणे हा अन्यायकारक निर्णय असून, तो कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाही, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई अध्यक्ष एड अमोल मातेले यांनी दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते आणि युवक मुंबई अध्यक्ष ॲडव्होकेट अमोल मातेले यांनी मुख्य अभियंता, जल अभियंता विभाग यांना ई-मेलद्वारे पत्र पाठवत पाणीपट्टीतील ८% दरवाढ तातडीने मागे घेण्याची मागणी केली आहे.
अमोल मातेले यांची प्रमुख मागणी:
• पाणीपट्टीतील ८% दरवाढ तातडीने रद्द करावी.
• महानगरपालिकेच्या भ्रष्टाचार आणि अनावश्यक खर्चांवर नियंत्रण आणावे.
• जलशुद्धीकरण प्रक्रियेची पारदर्शक माहिती नागरिकांसमोर सादर करावी.
जर या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा ॲडव्होकेट अमोल मातेले यांनी दिला आहे.
“जर दरवाढ मागे घेतली नाही, तर जल अभियंता विभागातील संबंधित अधिकाऱ्यांचे तोंड काळे करण्याचे कठोर पाऊल उचलले जाईल,” असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.
महागाईने आधीच त्रस्त असलेल्या मुंबईकरांवर अधिक आर्थिक भार लादणे सहनशीलतेच्या पलीकडे आहे. मुंबईकरांचे हक्क आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा लढा सुरू राहील, असेही त्यांनी नमूद केले.