मुंबई – निसर्ग आणि पर्यावरण रक्षणाचा सकारात्मक संदेश देणारा ‘ग्रीन गटारी’ हा उपक्रम यंदाही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात (SGNP) उत्साहात पार पडला. येऊन एन्व्हायर्नमेंटल सोसायटी, गो ग्रीन फाउंडेशन ट्रस्ट आणि फॉर फ्युचर इंडिया या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात १७० हून अधिक स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.
गटारी अमावस्या आणि नीज आषाढ अमावस्या निमित्त उद्यानात होणाऱ्या अनियंत्रित गर्दीमुळे पर्यावरणावर व वन्यजीवांवर होणाऱ्या परिणामाला आळा घालण्यासाठी हा उपक्रम एक सकारात्मक पाऊल ठरला आहे. मुंबईच्या ‘हरित फुफ्फुस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या SGNPमध्ये लाखो पर्यटक दरवर्षी भेट देतात. मात्र, सण-उत्सवाच्या काळात कचरा, आरडाओरडा आणि असंवेदनशील वर्तनामुळे निसर्गावर प्रतिकूल परिणाम होतो.

यंदाच्या उपक्रमात स्वयंसेवकांनी नवपाडा व चिंचपाडा परिसरातील वनवस्त्या आणि रस्त्यांची स्वच्छता केली. पाटकर कॉलेज, केईएस कॉलेज, एलआरएमसी कॉलेज, आणि ठाकूर स्कूल ऑफ आर्किटेक्चर अँड प्लॅनिंग यांच्या एनएसएस युनिट्सच्या विद्यार्थ्यांनी विशेष योगदान दिले. एकत्रितपणे ११०० किलोपेक्षा अधिक कचरा गोळा करण्यात आला.
‘हा उपक्रम केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित नसून तो पर्यावरणाबद्दलची जबाबदारी आणि निसर्गाविषयीचा आदर व्यक्त करणारा आहे,’ असे मत आयोजकांनी व्यक्त केले. ‘सण साजरे करताना पर्यावरणाची हानी होणार नाही, याची जबाबदारी आपली आहे. हीच खरी सुसंस्कृतता आणि जबाबदार नागरिकत्व आहे,’ असे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे.
फॉर फ्युचर इंडिया संस्थेच्या प्रतिनिधींनी सांगितले की, “ग्रीन गटारी हा पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचा एक प्रयत्न आहे. प्लास्टिकचा वापर टाळा, कचरा योग्य ठिकाणी टाका, आणि वन्यजीवांना त्रास होईल असे कोणतेही कृत्य करू नका – हा संदेश तरुणाईपर्यंत पोहचवण्यासाठीच हा उपक्रम आहे.”
या उपक्रमात महाराष्ट्र वन विभागाचे कर्मचारी, वनरक्षक आणि निसर्गप्रेमी नागरिकांनीही मोलाचे सहकार्य केले. ‘ग्रीन गटारी’ उपक्रमाने पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचा एक आदर्श नमुना निर्माण केला असून, पुढील वर्षी अधिक व्यापक स्तरावर याचे आयोजन होणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.