मुंबई – “शिवसेना (ठाकरे गट)चे नेते संजय राऊत यांच्या ‘सरकार पडणार’ या सततच्या भविष्यवाण्या आजवर कधीच खऱ्या ठरलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला आम्ही काहीच महत्त्व देत नाही,” अशी रोखठोक प्रतिक्रिया मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी आज मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
अलीकडेच संजय राऊत यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर केलेल्या टिकेबाबत बोलताना राणे म्हणाले, “संघ आणि सरसंघचालक भागवत यांना समजून घेण्यासाठी जी बौद्धिक पात्रता लागते ती संजय राऊत यांच्यात नाहीच. उलट, जर भागवत आणि मुस्लिम मौलानांमध्ये संवादामुळे लव्ह जिहाद आणि लँड जिहाद थांबत असेल, तर अशा भेटींचं स्वागतच व्हायला हवं.”
संजय राऊत यांनी केलेल्या “चार ते पाच मंत्र्यांना डच्चू मिळणार” या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राणे म्हणाले, “अशी कोणतीही शक्यता नाही. “सामना” आता ठाकरे गटातील लोकही वाचत नाहीत. काही वाहिन्यांना कंटेंट नसल्यामुळे राऊत यांची विधाने चालवावी लागतात.”
“लव्ह जिहाद नसतोच” असे म्हणणाऱ्या अबू आझमी आणि जितेंद्र आव्हाड यांना लक्ष्य करत राणे म्हणाले, “लव्ह जिहादला फंडिंग करणाऱ्या झांगूर बाबाचं प्रकरण समोर आलंय, पण आता हे दोघं गप्प का आहेत?”
“सैयारा” चित्रपटामुळे मराठी चित्रपटांना मल्टीप्लेक्स न मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर राणे म्हणाले, “आम्हीही मराठीच आहोत. निर्मात्यांनी आम्हाला संपर्क साधावा, आम्ही नक्कीच तोडगा काढू.”
या पत्रकार परिषदेत त्यांनी त्यांच्या खात्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती देताना सांगितले की, “आता राज्यातील सर्व अनुदानित मत्स्य प्रकल्पांना फक्त राज्यातीलच – केंद्र पुरस्कृत, राज्य सरकारच्या पथदर्शी आणि नोंदणीकृत उत्पादकांकडूनच मत्स्य खाद्य खरेदी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.”
यामुळे आतापर्यंत परराज्यातील काही कंपन्यांचे आणि काही अधिकाऱ्यांच्या संगनमताचे राजकारण संपुष्टात येणार असून, स्थानिक उत्पादकांना मोठा लाभ होईल, असा विश्वासही राणे यांनी व्यक्त केला.