ललित गांधी यांचा इशारा
शिवसेना उध्दव ठाकरे यांच्या गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी व्यापाऱ्यांबद्दल बोलताना ते खोटे आहेत,फसवतात, भेसळ करतात असे बेछूट आरोप जाहीररीत्या केले होते.याबद्दल त्यांनी तात्काळ लेखी माफी न मागितल्यास येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना त्याची झळ सोसावी लागेल असा इशारा व्यापारी उद्योजकांची शिखर संस्था असलेल्या “महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अग्रिकल्चर” चे अध्यक्ष ललित गांधी यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिला.
व्यापारी,उद्योजक हे देशाच्या व राज्याच्या अर्थव्यवस्थेचे मुख्य घटक असून अर्थव्यवस्थेत कररूपाने व रोजगार निर्मितीच्या रूपाने सर्वाधिक योगदान देणाऱ्या महत्त्वपूर्ण घटकांच्या बद्दल राजकीय नेत्याकडून अशी बेजबाबदारपणे विधाने होणे हे राज्याची प्रतिमा खराब करणारी आहे. महाराष्ट्रातील व्यापार उद्योग जगताची जगभरात प्रतिष्ठा आहे.अशा बेजबाबदार व बेछूट विधानामुळे तुमची राजकीय पोळी भाजत असेल,परंतु त्यामुळे राज्याचे भरून न येणारे नुकसान होते याची जबाबदारी कोणी घ्यावी,असाही परखड सवाल गांधी यांनी खा.राऊत यांना विचारला.
कोरोना काळात देशातल्या लोकांना अविरत अखंडपणे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारा व्यापारी हा एक प्रकारे लोकांसाठी जीवनदूतच ठरला.सर्वच सामाजिक क्षेत्रामध्ये सहभागी असणारा व्यापारी,उद्योजक हा समाजातील एक महत्त्वपूर्ण घटक असून या क्षेत्राबद्दल अशा प्रकारचे उद्गार काढणे हे व्यापारी कधीही सहन करणार नाही, असा थेट निर्वाणीचा इशाराही गांधी यांनी खा. राऊत यांना दिला.
महाराष्ट्रातील एक कोटीहून अधिक व्यापारी, उद्योजकांच्या वतीने “महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स” ने खा.संजय राऊत यांच्या वक्तव्याचां तीव्र निषेध केला असून त्यांनी माफी न मागितल्यास येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या कोणत्याच उमेदवारांना मतदान करायचे नाही अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली असून त्यानंतरही या बेजबाबदार विधानाबद्दल तीव्र आंदोलन उभारून त्यांना माफी मागण्यास भाग पाडले जाईल असेही गांधी यांनी यावेळी ठामपणे नमूद केले.
संजय राऊत यांच्या विधानाचे महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात पडसाद उमटत असून व्यापारी उद्योजकांच्या मनात याबद्दल प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. व व्यापारी याविषयी तीव्र आंदोलन करण्याची तयारी करत असल्याची माहितीही ललित गांधी यांनी दिली.