मुंबई : पैठण तालुक्यातील आपेगाव येथे संत सृष्टी निर्माण प्रकल्प आणि संत एकनाथ महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला असून त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत दिली.
अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, सदस्यांनी आपल्या मतदारसंघातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी प्रस्ताव सादर केल्यास राज्य सरकार त्यावर सकारात्मक विचार करेल.
दरम्यान, एसआरए योजनांमध्ये बोगस लाईट बिलांचा पुरावा म्हणून वापर करून झोपडपट्टी समाविष्ट केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून त्याबाबत माहिती घेऊन आवश्यक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच एकमजली झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासासंदर्भात अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असेही देसाई यांनी सांगितले.
यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही सांस्कृतिक क्षेत्रातील विविध उपक्रमांची माहिती दिली. कोकणात इसवीसनपूर्व सुमारे २० हजार वर्षांपूर्वीची कातळ शिल्पे (Rock Art) आढळून आली असून त्यावर संशोधन आणि अभ्यासासाठी १५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे वस्तुसंग्रहालय उभारण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. तसेच वरळी आणि प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर आणि पु. ल. देशपांडे अकादमीच्या विकासानंतर एका वर्षात सुमारे एक हजार सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले असून एक लाखाहून अधिक प्रेक्षकांनी त्याचा लाभ घेतला, अशी माहिती शेलार यांनी दिली.

