X : @therajkaran
मुंबई
पुण्याच्या आरोपीला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयातील (Sassoon Hospital, Pune) डॉक्टरांनी ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केली आहे. याबाबत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (LoP Vijay Wadettiwar) यांनी संताप व्यक्त केला असून पुण्यातील ससून रुग्णालय हे रुग्णालय आहे की ‘गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा’ असा परखड सवाल उपस्थित केला आहे.
श्री. वडेट्टीवार म्हणतात की, आधी ललित पाटीलचे (Lalit Patil) धंदे याच हॉस्पिटलमधून सुरु होते. ललित पाटीलचे अवैध धंदे सरकारमधील कोणत्या मंत्र्याच्या आशीर्वादाने सुरू होते हे महाराष्ट्राला माहिती आहे. आता पुण्याच्या आरोपीला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केली.
पुण्यातील हॉस्पिटल गुंड, आरोपी यांच्यासाठी आहे का? असा सवाल करत वडेट्टीवार म्हणाले की, ललित पाटील प्रकरणापासून या हॉस्पिटलच्या कारभारावर आधीच शंका होती, पण सरकार आणि रुग्णालय प्रशासनाने या शंकेवर आता शिक्कामोर्तब केले आहे.
पुणे ‘हिट अँड रन’ (Hit and Run case) प्रकरणात पूर्ण व्यवस्थेने आरोपीला मदत केली आहे. दारू पिऊन दोन लोकांची हत्या करणाऱ्याला मदत करण्यासाठी किती जणांनी मेहनत घेतली हे समोर येत आहे. या सर्वांना कठोर शिक्षा व्हायला हवी. म्हणून आम्ही न्यायिक चौकशीची मागणी करत आहोत. पोलिस ते हॉस्पिटल सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.