महाराष्ट्र ताज्या बातम्या

लाखोंची फी पण मुलांची सुरक्षा नाही? विधान परिषदेत चित्रा वाघ यांचा सरकारला थेट सवाल

Chitra Wagh raising school child safety issue in Maharashtra Legislative Council

मुंबई : राज्यातील शाळांमध्ये लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून या विषयावर सरकारने ठोस भूमिका घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी विधान परिषदेत केली.

विधान परिषदेत बोलताना वाघ म्हणाल्या की, राज्यातील अनेक नामांकित शाळा पालकांकडून लाखोंची फी घेतात. पालक आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी मोठा आर्थिक त्याग करतात; मात्र मुलांच्या सुरक्षेच्या बाबतीत अनेक शाळा निष्काळजीपणा करत असल्याचे दिसून येते.

बदलापूरसारखी धक्कादायक घटना घडल्यानंतरही राज्यातील विविध ठिकाणी, विशेषतः मुंबईतील भांडुपसह काही शाळांमध्ये लहान मुलांबरोबर गैरप्रकार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे हा प्रश्न केवळ एखाद्या घटनेपुरता मर्यादित नसून संपूर्ण शिक्षण व्यवस्थेशी संबंधित आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

अशा प्रकरणांमध्ये अनेकदा शाळांकडून “संबंधित कर्मचारी आमच्या पेरोलवर नाही, तो कॉन्ट्रॅक्टवर आहे” असे स्पष्टीकरण दिले जाते. मात्र एखादे मूल शाळेच्या परिसरात प्रवेश केल्यानंतर ते बाहेर पडेतोपर्यंत त्याच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी शाळा आणि संस्थेचीच असते. कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी असल्याचे कारण देऊन जबाबदारी टाळता येणार नाही, असेही वाघ यांनी ठामपणे सांगितले.

मुंबईतील एका शाळेत लिफ्ट दुरुस्तीसाठी आलेल्या बाहेरील व्यक्तीने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना घडल्याचा उल्लेख करत त्यांनी शाळांमध्ये येणाऱ्या बाहेरील व्यक्तींवर नियंत्रण ठेवण्याची गरजही अधोरेखित केली.

यावेळी त्यांनी सरकारला थेट प्रश्न विचारला की, शाळांमधील सुरक्षेबाबत निष्काळजीपणा केल्यामुळे आतापर्यंत राज्यातील किती शाळांवर किंवा संस्थांवर कारवाई करण्यात आली आहे? मोठ्या नावाच्या शाळांवर कारवाई करण्यास सरकार धजावत नाही, अशी परिस्थिती का निर्माण झाली आहे, याचे स्पष्ट उत्तर राज्यातील पालकांना मिळाले पाहिजे, असे त्यांनी म्हटले.

तसेच काही ठिकाणी पालक एकत्र येऊन खाजगी बस किंवा वाहनांद्वारे मुलांची ने-आण व्यवस्था करतात. अशा वाहनांनाही शालेय वाहतूक नियम लागू होतात का, याबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे सरकारने जाहीर करावीत, अशी मागणी त्यांनी केली.

३ ते ५ वर्षांच्या लहान मुलांच्या शाळांसाठी अनिवार्य नोंदणी आणि अधिकृत मान्यता देण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. मुलांच्या सुरक्षेसारख्या गंभीर विषयात निष्काळजीपणा चालणार नाही, असे सांगत राज्य सरकारने या विषयावर कठोर पावले उचलावीत, अशी मागणी वाघ यांनी केली.

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात