By: योगेश त्रिवेदी
मुंबई: आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना आणि शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधी या दोन्ही योजना स्वतंत्र करुन या दोन्ही योजनांसाठी प्रत्येकी किमान शंभर कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी, तसेच या योजनेचा लाभ पत्रकारांना मिळण्यासाठी जाचक अटी काढून टाकण्यात याव्यात. ज्येष्ठ पत्रकारांनी जाचक अटींच्या तिरडीवरुनच सरणावर जावे अशी अपेक्षा सरकारची आहे काय ? अशा घणाघाती शब्दांत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांनी आपली भूमिका मांडली.
ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या विद्यमाने ठाणे येथील मराठी ग्रंथ संग्रहालय सभागृहात पत्रकारांचा मेळावा आणि ज्येष्ठ पत्रकार एस. रामकृष्णन यांना जीवनगौरव पुरस्कार तसेच अनेक पत्रकारांना विविध पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य, योगेश वसंत त्रिवेदी, किरण नाईक, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, माजी जिल्हा माहिती अधिकारी निरंजन राऊत, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तुषार राजे, सरचिटणीस नारायण शेट्टी, सचिव श्रीकांत खाडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. दिलीप शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी परखड भूमिका मांडताना योगेश त्रिवेदी यांनी सांगितले की, ज्येष्ठ पत्रकारांसाठी राज्य सरकारने आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना सुरू केली आहे, परंतु ही योजना शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधी अंतर्गत समाविष्ट केली आहे. शंकरराव चव्हाण मोठे की आचार्य बाळशास्त्री जांभेकर मोठे? अहो, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण नियतकालिक सुरु केले आणि आपण तो दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा करीत असतो. सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन बंद केल्यामुळे पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या नांवाने ज्येष्ठ पत्रकारांसाठी सन्मान योजना सुरू केली आहे. परंतु या योजनेचा लाभ मिळण्यासाठी ज्या अटी आहेत त्या अतीशय जाचक आहेत. त्या जाचक अटी काढून टाका आणि पत्रकारांना आयुष्याच्या संध्याकाळी सन्मानपूर्वक सन्मान योजना मिळेल याकडे कटाक्षाने लक्ष द्या.
कर्करोग, ह्रुदयविकार आदी दुर्धर आजाराने त्रस्त झालेल्या पत्रकारांना अर्थसहाय्य व्हावे म्हणून शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधी योजना आहे. तर ज्येष्ठ पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेतून अर्थसहाय्य देण्यात येते. या दोन्ही योजना स्वतंत्र करुन प्रत्येकी शंभर कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली तर त्याचा उपयोग होऊ शकेल, असेही योगेश वसंत त्रिवेदी यांनी स्पष्टपणे सांगितले.
ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांनी ठाणे जिल्हा पत्रकार संघ हा आमच्या जिव्हाळ्याचा आणि बांधिलकीचा आहे. अनेक दिग्गज पत्रकार या ठिकाणी कार्यरत होते. अनेक उपक्रम राबविले आहेत, असे सांगून मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे या इमारतीच्या इतिहासाचा आवर्जून उल्लेख केला. वि. स. खांडेकर, आचार्य अत्रे, नी. गो. पंडितराव आदी दिग्गज साहित्यिक मान्यवरांच्या भेटीच्या घटना विजय वैद्य यांनी नमूद केल्या. जव्हार येथून ठाणे येथे येऊन मो. ह. विद्यालय येथे आपण शिक्षण घेतले असल्याचेही विजय वैद्य यांनी अभिमानाने सांगितले.
दैनिक जनादेश चे संपादक कैलाश म्हापदी यांनी आपल्या घणाघाती भाषणात अधिस्वीकृती नसली तर तो पत्रकार नाही कां ? असा परखड सवाल केला. चौथा स्तंभ चौथा, स्तंभ म्हटले जाते पण त्याला खिळखिळा करुन ठेवलाय. या स्तंभाकडे राज्यकर्त्यांनी हवे तेवढे लक्ष दिले नाही. हजारो कोटी जाहीर करण्यात येतात पण पत्रकारांना देण्यासाठी हात आखडतो कां ? असेही म्हापदी यांनी ठणकावून सांगितले.
किरण नाईक यांनी सर्वांनी एकजुटीने काम करुन आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.