मुंबई
दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला जात असून यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान आदित्य ठाकरे यांच्या काकी आणि राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांचं वक्तव्य सध्या चर्चेत आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी दोन वेगवेगळ्या राजकीय चुली मांडल्या आहेत. दोघंही एकमेकांवर तिखट शब्दात हल्ला करतात. काही दिवसांपूर्वी तर दोघेही एकत्र येण्याची चर्चा सुरू होती. आता आदित्य ठाकरे संकटात सापडले असताना त्यांच्या काकी शर्मिला ठाकरे बचावासाठी पुढे आल्या आहेत.
आज नवनिर्माण सेनेच्या स्वयंरोजगार विभागाकडून महिलांसाठी एका विशेष कार्यक्रमाचं मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विशेष अतिथी म्हणून शर्मिला ठाकरे उपस्थित होत्या. यावेळी मीडियाशी बोलताना त्यांना दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंवर होणाऱ्या आरोपाविषयी प्रश्न विचारण्यात आल्या, यावेळी शर्मिला ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, आदित्य असं काही करेल असं मला वाटत नाही. चौकशा तर कोणीही लावेल. आम्ही पण त्यातून गेले आहोत, असं म्हणत शर्मिला ठाकरेंनी आदित्य ठाकरेंची पाठराखण केली.
शर्मिला ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काकी पुतण्याच्या बचावासाठी पुढे आल्या असं म्हटलं जात आहे.