ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सांगली

शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं आज अकस्मात निधन झालं. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. न्यूमोनिया झाल्याने त्यांना सांगलीतील रुग्णालयात मंगळवारी दुपारी दाखल करण्यात आलं होतं. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी होते, अशीही त्यांची ओळख होती.

अनिल बाबर यांच्या निधनाने आपण खऱ्या अर्थाने शिवसेनेचा समाजकार्याचा वसा चालवणारा एक अतिशय प्रभावी असा लोकप्रतिनिधी गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. अनिल बाबर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले, आपल्या खानापूर आटपाडी मतदारसंघांमध्ये त्यांनी शिवसेनेचे केलेले कार्य कधीही न विसरण्याजोगे आहे. सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागामध्ये पाणी आणण्यासाठी सिंचनासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. कृष्णा खोऱ्यातील पाणी आणि टेंभू योजना कार्यान्वित व्हावी म्हणून ते सतत झगडत होते. त्यांना पाणीदार आमदार म्हणूनही ओळखले जात होते.

https://twitter.com/mieknathshinde/status/1752538753040798135

अनिल बाबर यांची कारकीर्द

  • वयाच्या १९ व्या वर्षी मूळगाव गार्डी गावचे सरपंच
  • १९७२ मध्ये सांगली जिल्हा परिषदेत सदस्य
  • १९८१ मध्ये सांगली जिल्हा परिषदेच्या इमारत विभागाचे सभापतीपद
  • १९८२-१९९० दरम्यान खानापूर पंचायत समितीचे सभापतीपद
  • १९९० मध्ये पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली आणि जिंकले
  • १९९९ मध्ये पुन्हा आमदारकी
  • १९९९-२००८ दरम्यान नॅशनल हेवी इंजिनियरिंग को-ऑप लिं. पुणेचे चेअरमनपद
  • २०१४ मध्ये राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत
  • २०१४ – विधानसभेची निवडणूक जिंकली, सांगली जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार
  • २०१९ मध्ये पुन्हा शिवसेनेकडून विधानसभेची निवडणूक जिंकले.

बेघरांना घरे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे किंवा शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शिक्षणाचा तळागाळापर्यंत केलेला प्रसार असो, अनिल बाबर यांनी एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून काम केले. खानापूर आटपाडी भागामध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी अनिल बाबर हे कायम एका लढाऊ वृत्तीने लढले. त्यांनी या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्या निधनाने शिवसेनेचा एक ज्येष्ठ लोकप्रतिनिधी, माझा जवळचा सहकारी आणि मार्गदर्शक आम्ही गमावला आहे असेही मुख्यमंत्री आपल्या शोक संदेशात म्हणतात.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून श्रद्धांजली…
विधानसभा सदस्य अनिल बाबर यांच्या अकस्मात निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांच्या निधनाने एक संवेदनशील लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी ते सरपंच म्हणून निवडून आले. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य ते 4 वेळा विधानसभा सदस्य अशी प्रदीर्घ त्यांची राजकीय कारकिर्द राहिली. मतदारसंघातील प्रश्न घेऊन ते सातत्याने भेटत असत. त्यांचे असे अकस्मात आपल्यातून निघून जाणे, मनाला अत्यंत वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात