मुंबई: भारतातील वेगाने विस्तारत असलेल्या रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (REIT) क्षेत्राच्या सर्वोच्च उद्योग संघटनेच्या अध्यक्षपदी प्रथमच एका मराठी व्यावसायिकाची नियुक्ती झाली आहे. नॉलेज रिअॅल्टी ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) शिरीष गोडबोले यांची इंडियन REIT असोसिएशन (Indian REITs Association – IRA) च्या अध्यक्षपदी तत्काळ प्रभावाने नियुक्ती करण्यात आली आहे.
ब्रुकफिल्ड इंडिया रिअल इस्टेट ट्रस्टचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक अग्रवाल यांच्या कार्यकाळानंतर गोडबोले यांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे.
२०२३ मध्ये भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (SEBI) तसेच केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेली इंडियन REIT असोसिएशन ही भारतातील सूचीबद्ध REIT चे प्रतिनिधित्व करणारी प्रमुख उद्योग संघटना आहे. REIT क्षेत्रातील धोरणात्मक संवाद, गुंतवणूकदार जागरूकता, नियामक समन्वय आणि उद्योगाच्या शाश्वत विकासासाठी ही संघटना कार्य करते.
नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना गोडबोले यांनी सांगितले की, REIT क्षेत्रात अधिक पारदर्शकता, उत्तम कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि गुंतवणूकदारांचा विश्वास वाढविण्यासाठी ते प्रयत्नशील राहतील. तसेच उद्योगाच्या पुढील विस्तारासाठी सर्व सदस्य REIT सोबत समन्वयाने काम करण्यावर भर दिला जाईल.
भारतीय REIT क्षेत्राची वाढती ताकद
भारतातील REIT क्षेत्राने गेल्या काही वर्षांत वेगाने प्रगती केली आहे. ३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीत देशातील पाच सूचीबद्ध REIT नी ४.२५ लाखांहून अधिक युनिटधारकांना एकत्रितपणे ₹२,५६६ कोटींपेक्षा अधिक वितरण केले. संपूर्ण २०२५-२६ आर्थिक वर्षात हे वितरण ₹८,९०० कोटींहून अधिक झाले आहे.
२२ मे २०२६ पर्यंत भारतीय REIT क्षेत्राचे एकत्रित बाजार भांडवल ₹१.७० लाख कोटींहून अधिक झाले असून, देशातील पाच सूचीबद्ध REITस् सुमारे १८७ दशलक्ष चौरस फूटांपेक्षा अधिक ग्रेड-ए कार्यालयीन आणि किरकोळ स्थावर मालमत्तेचे व्यवस्थापन करतात.
या पाच REIT स् मध्ये ब्रुकफिल्ड इंडिया रिअल इस्टेट ट्रस्ट, एम्बसी ऑफिस पार्क्स REIT, नॉलेज रिअॅल्टी ट्रस्ट, माइंडस्पेस बिझनेस पार्क्स REIT आणि नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट यांचा समावेश आहे. स्थापनेपासून आतापर्यंत या REIT स् नी आपल्या युनिटधारकांना ₹३१,७०० कोटींपेक्षा अधिक वितरण केले आहे.
जागतिक अनुभवाची साथ
शिरीष गोडबोले यांना जागतिक स्थावर मालमत्ता गुंतवणूक आणि वित्त क्षेत्रातील २५ वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्यांनी AEW Capital Management, Morgan Stanley आणि Goldman Sachs यांसारख्या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांमध्ये वरिष्ठ नेतृत्वाच्या भूमिका सांभाळल्या आहेत.
सध्या ते नॉलेज रिअॅल्टी ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी असून, बाजार भांडवलाच्या दृष्टीने ही भारतातील सर्वात मोठी सूचीबद्ध REIT संस्था मानली जाते. त्यांनी अमेरिकेतील बोस्टन येथील नॉर्थईस्टर्न विद्यापीठातून एमबीए पदवी प्राप्त केली आहे.

