X : @NalawadeAnant
मुंबई – विधानपरिषदेच्या ४ जागांसाठी २६ जून रोजी होणाऱ्या निवडणूकीत महायुतीत बिघडी झाली आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवाजी शेंडगे यांना शिवसेनेने पुरस्कृत करण्याचा निर्णय आज जाहीर केला. दरम्यान, या आधीच या मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाने शिक्षक परिषदेचे शिवनाथ दारडे यांना पुरस्कृत केले आहे.
शिवसेना सचिव संजय मोरे म्हणाले की, मुंबई व नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने आपले उमेदवार घोषित केलेले आहेत. त्यातील नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेनेने किशोर दराडे यांचे नाव आधीच घोषित केलेले आहे. तर मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी आज आम्ही शेंडगे यांचे नाव शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित करत आहोत.
शिवाजी शेंडगे यांनी याआधी २०१८ मध्ये शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांनी दुसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य घेऊन चांगले यश मिळवले होते. शिक्षण क्षेत्रातील त्यांचा अनुभवही दांडगा असून कोणतेही मतभेद न बाळगता शिवसेना ही निवडणूक लढवणार आहे आणि पूर्ण ताकद लावून आपला पुरस्कृत उमेदवार निवडून येणार असल्याचा दावाही मोरे यांनी केला.
यावेळेस शिवाजी शेंडगे म्हणाले की, मी स्वतः शिक्षक असून मागील १५ वर्षे शिक्षकांच्या हितासाठी व कल्याणासाठी प्रयत्नरत असून शिक्षकांच्या हितासाठी अनेक योजनांना मार्गी लावण्यासाठी झटत आहे. जशी जुनी पेन्शन योजना, २००५ नंतर निवृत्त झालेल्या शिक्षकांना पगारातील ५०% रक्कम व महागाई भत्ता पेन्शन म्हणून मिळणार आहे. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या पर्मनंट किंवा नंतर ग्रँड मिळालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय झाला आहे. लवकरच त्याचा जीआर निघणार आहे. अंशतः अनुदानित किंवा विना अनुदानित शिक्षकांना ६०% अनुदान म्हणजेच पगार सुरु केला आहे व लवकरच २०% टप्पा वाढवून ८०% टक्के अनुदान केले जाणार आहे.
खासगी (प्रायव्हेट) शाळांमधील शिक्षकांना ज्यांना पगाराची गॅरंटी नसते त्यांना मिनिमम सॅलरी ऍक्ट आणून किमान ३५ ते ५० हजार पगार मिळाला पाहिजे व त्यांच्या सर्व्हिस गॅरंटीसाठी एक आयोग नेमला जावा व कॅशलेस मेडिक्लेम सर्व शिक्षकांना मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यामधील अनेक गोष्टी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मार्गी लावल्या आहेत. तर उर्वरित गोष्टी सुद्धा लवकरच पूर्ण होणार आहेत. शिवसेना नेते व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मी ही निवडणूक लढवत असून मला पूर्ण खात्री आहे की, मी केलेल्या कामांच्या जोरावर मी मोठ्या बहुमताने विजय मिळवेन,असा दावा शेंडगे यांनी केला.