मुंबई : शिवसेनेतील एकनाथ शिंदे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटातील धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरील वादावर उद्या (बुधवार, ८ ऑक्टोबर) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर पक्षाचे बहुसंख्य लोकप्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. त्यानंतर पक्ष आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरून उद्धव ठाकरे आणि शिंदे गटांमध्ये तीव्र संघर्ष सुरू झाला. हा वाद अखेरीस न्यायालयात गेला.
न्यायालयाच्या निर्देशानुसार निर्णय प्रक्रिया राबवण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाकडे देण्यात आली होती. आयोगाने अखेरीस शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले. मात्र, हे चिन्ह शिंदे गटाला कायमस्वरूपी मिळालेले नाही.
दरम्यान, न्या. सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर शिवसेनेच्या चिन्ह आणि नावाबाबतचा खटला सुरू आहे. १९ ऑगस्ट ते १० सप्टेंबरदरम्यान राष्ट्रपती आणि राज्यपाल वादावर घटनापीठात सुनावणी झाल्याने हा खटला काही काळ स्थगित राहिला होता.
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल या निवडणुकांपूर्वीच लागण्याची शक्यता आहे. या निकालानंतर खरी शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण हे चिन्ह कायम कोणाकडे राहणार — एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे — हे स्पष्ट होणार आहे.