डॉ. नितीन नांदगावकर यांच्या हस्तक्षेपामुळे खाजगी रुग्णालयांची माघार
मुंबई : राज्यातील खाजगी व सार्वजनिक रुग्णालयांमध्ये रुग्णांकडून जबरदस्तीने आकारले जाणारे डॉक्टर व्हिजिट किंवा प्रिव्हिलेज शुल्क आता रुग्णांकडून आकारले जाणार नाही. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते डॉ. नितीन नांदगावकर यांनी रुग्णांचे हित लक्षात घेऊन केलेल्या कठोर पाठपुराव्याला यश मिळाले असून अनेक नामांकित रुग्णालयांनी यापुढे हे शुल्क न आकारण्याची हमी दिली आहे.
डॉ. नांदगावकर यांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करत रुग्णालयांना विनंतीपत्र पाठवून, “पुढेही हे शुल्क आकारल्यास शिवसेनेचा दणका काय असतो, ते अनुभवाला येईल,” अशी स्पष्ट तंबी दिली होती. यानंतर तातडीने प्रतिक्रिया देत काही रुग्णालयांनी शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला.
सामान्य रुग्णांना डॉक्टर प्रिव्हिलेज शुल्कामुळे हजारो रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत होता. डॉक्टरांच्या व्हिजिटच्या नावाने दररोज आकारले जाणारे हे शुल्क रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाइकांच्या पाठीवरचा भुर्दंड ठरत होता. आता ही लूट थांबवण्यात यश आल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
“जर कोणतेही रुग्णालय पुन्हा असा अन्यायकारी शुल्क लादत असेल, तर लगेच आम्हाला कळवा. शिवसेना तुमच्या मदतीला तत्काळ धावून येईल आणि हे शुल्क थोपवेल,” असा विश्वासही डॉ. नांदगावकर यांनी व्यक्त केला आहे.