नवी दिल्ली
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या सत्रात विरोधी पक्षाने घातलेला गोंधळ आणि आंदोलनामुळे आज मंगळवारी (19 डिसेंबर) 49 खासदारांचं निलंबन करण्यात आलं. अशा प्रकारे आतापर्यंत 141 खासदार निलंबित करण्यात आले असून हे संसदेच्या इतिहासातील मोठी कारवाई मानली जात आहे.
निलंबित करण्यात आलेल्या खासदारांना संपूर्ण हिवाळी अधिवेशनात सहभागी होण्यास निर्बंध घालण्यात आले आहे. लोकसभेत सुप्रिया सुळे, मनिष तिवारी, शशी थरूर, मोहम्मद फैसल, कार्ति चिंदबरम, सुदीप बंधोपाध्याय, डिंपल यादव आणि दानिश अलीसह अनेक विरोधी पक्षाच्या खासदारांना पुढील हिवाळी अधिवेशनापर्यंत निलंबित करण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, सभागृहात कोणत्याही प्रकारचे फलक आणण्यास मनाई असताना नुकत्याच झालेल्या निवडणुकीतील अपयशानंतर ते अशा प्रकारची पावलं उचलत आहेत. याचसाठी खासदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव आणला जात आहे.
यानंतर लोकसभातील केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सुप्रिया सुळे, मनिष तिवारी, शशी थरूर, मोहम्मद फैसल, कार्ति चिंदबरम, सुदीप बंधोपाध्याय, डिंपल यादव आणि दानिश अली यांच्यासह अन्य विरोधी पक्षाच्या खासदारांचं निलंबन करण्याचा प्रस्ताव सादर केला. सोमवारीही (18 डिसेंबर) लोकसभेतील 33 आणि राज्यसभेतील 45 खासदार मिळून एकूण 78 खासदारांचं निलंबन करण्यात आलं होतं.