उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना घणाघाती टोला
मुंबई: राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू आहे. गुरुवारी रात्री सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करत मोठा राजकीय भूकंप घडवला.
या प्रवेशानंतर झालेल्या छोटेखानी भाषणात उपमुख्यमंत्री शिंदेंनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता बोचरी टीका केली. ते म्हणाले, “सिद्धाराम म्हेत्रे हे श्रीमंत घराण्यात जन्मले, पण कधीच त्यांना श्रीमंतीचा अहंकार आला नाही. ते जमिनीवरचे राहिले. पण काही जण वडिलांच्या नावावर फुशारक्या मारतात, बढाया मारतात!”
सोलापूरच्या मुक्तागिरी निवासस्थानी झालेल्या या समारंभात सिद्धाराम म्हेत्रे यांच्यासह त्यांचे बंधू शंकर म्हेत्रे यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेसमध्ये अनेक वर्षे अक्कलकोट विधानसभेचे नेतृत्व केलेल्या म्हेत्रे बंधूंनी पक्षात दिशाहीनता असल्याचे सांगत आपल्या शेकडो समर्थकांसह शिवबंधन बांधले.
या वेळी मंत्री दादा भुसे, मंत्री संजय राठोड आणि विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे उपस्थित होत्या.
शिंदे म्हणाले, “सिद्धाराम आणि शंकर म्हेत्रे ही खरी राम-लक्ष्मणाची जोडी आहे. त्यांचे वडील सातलिंग्गप्पा म्हेत्रे हे अक्कलकोटचे प्रतिष्ठित नेते होते. त्यांनी कधीही जात, धर्म, पक्ष न पाहता जनतेची सेवा केली. त्यामुळे म्हेत्रे कुटुंबीयांना हिंदू-मुस्लिम समाजाचा समविचारी पाठिंबा आहे.”
शिंदेंनी काँग्रेसवरही नाव न घेता टीका करताना म्हटले, “आज सिद्धारामजींनी काँग्रेसचा हात सोडून शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे. कारण जिथे दिशा नाही, तिथे दशा होते!”
ते पुढे म्हणाले की, “म्हेत्रे यांच्यासारख्या अनुभवी नेत्यानं शिवसेनेत प्रवेश केल्याने सोलापूर, अक्कलकोट आणि दुधनीचा राजकीय रंगच पालटेल.”
तीन वर्षांपूर्वीच्या राजकीय उठावाचा पुनरुच्चार करत शिंदेंनी सांगितले, “जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी तडजोड झाली, तेव्हा आम्ही सत्ता सोडली. देशातीलच नव्हे, तर ३३ परदेशांतही याची दखल घेतली गेली. याच उठावामुळे आज शिवसेनेचे ६० आमदार आहेत. विरोधकांचे तंबू रिकामे होतील आणि सोन्याचे दिवस सर्वसामान्यांसाठी आम्हीच घेऊन येणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.”
“लाडकी बहिण योजना बंद होणार नाही” याची ग्वाही देत शिंदेंनी कार्यकर्त्यांना सांगितले, “आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ‘गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक’ हे ब्रीद लक्षात ठेवून काम करायचं आहे.”
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शेवटी आपल्या प्रवासाचे अनुभव कथन करत जनतेपुढे नतमस्तक होत कृतज्ञता व्यक्त केली. “नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे उद्घाटन झाल्यानंतर आम्ही नाशिकमार्गे सोलापुरला येणार होतो. पण हवामानामुळे विमान उतरू शकले नाही. तरीही कार्यक्रम रद्द न करता पुण्याहून रस्ते मार्गे अक्कलकोटला आलो. कारण सिद्धारामजी आणि तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांना भेटण्याची इच्छा अधिक होती.”