ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

संभ्रम निर्माण करण्याची काहींची कार्यशैली असते – खा. सुनिल तटकरे

Twitter : @NalavadeAnant

मुंबई

आपलं स्थान डळमळीत झाल्यानंतर संभ्रम निर्माण करण्याची काहींची कार्यशैली असते. त्यामुळे त्या कार्यशैलीकडे मी जास्त काही पाहू शकत नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नाव न घेता खोचक टोला लगावला.

जयंत पाटील यांनी अजित पवार गटाचे काही आमदार संपर्कात असल्याचे भाष्य केले होते. त्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना तटकरे यांनी कोण कुणाच्या संपर्कात आहे हे माध्यमांशी बोलताना ठणकावून सांगितले. 

ज्यांनी वक्तव्य केले तेच आमच्या संपर्कात आहेत हे स्पष्ट करतानाच, त्याबद्दल अधिक काही बोलू शकत नाही आणि त्यांना नावे सांगायची असतील तर त्यांना तो अधिकार आहे. एखादा अपवाद सोडता उरलेले सर्व आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात आहेत. त्यापैकी काही आमदार हे दर मंगळवारी होणार्‍या विधीमंडळ बैठकीलाही उपस्थित असतात. त्यामुळे कोण कुणाच्या संपर्कात आहेत हे सर्वांना माहित आहे, असे सूचक वक्तव्यही तटकरे यांनी केले. त्याचवेळी राज्यभरात मिळणारा केविलवाणा प्रतिसाद लक्षात घेता असे वक्तव्य त्यांनी करणे हे स्वाभाविकच आहे, असा टोलाही तटकरे यांनी लगावला.

कधी कुणाचा करेक्ट कार्यक्रम होईल ते काही आता सांगता येऊ शकत नाही. त्यामुळे मी वारंवार सांगत आलो आहे की, जयंत पाटील यांच्या पोटातील पाणी हालत नाही आणि डोळ्यातील पाणी टिकत नाही. त्यामुळे करेक्ट कार्यक्रमाबाबत ते वारंवार बोलतच असतात. करेक्ट कार्यक्रम हा शब्दप्रयोग प्रचलित झाला तो जयंत पाटील यांच्यामुळेच. त्यामुळे बघुया कोण कुणाचा करेक्ट कार्यक्रम करतो ते, असा इशाराही तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना दिला.

दोन्ही आरक्षणातील संदर्भ वेगळे

मराठा समाजाला आरक्षण हवे आहे ते ओबीसीमधून हवे आहे. तर धनगर समाजाला हवे आहे ते एसटी राखीव म्हणून हवे आहे. त्यामुळे दोन्ही समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या वेगवेगळ्या पध्दतीच्या आहेत. जरांगे पाटील यांनी काय म्हणावे हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु दोन्ही आरक्षणातील संदर्भ वेगळे असल्यामुळे शेवटी जे काही ते ठरवतील ते पहायला मिळेल, असेही तटकरे यांनी यावेळी नमूद केले.

मराठा आरक्षणाबाबत आमची भूमिका ठाम

सकल मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, परंतु ओबीसी आरक्षणाला जराही धक्का न लावता ही आमची आजही भूमिका आहे. त्यामुळे यासंदर्भातील निर्णय राज्य सरकारने कायदेशीर कसोटीवर तपासून दिला पाहिजे. कारण अशा पध्दतीचे निर्णय दोनदा घेतले गेले. काही ठिकाणी शैक्षणिक अंमलबजावणी झाली आणि तेवढ्यातच सर्वोच्च न्यायालयाने हे निर्णय रद्दबादल ठरवले. त्यामुळेच राज्य सरकारने न्यायाधीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली आहे. ती समिती राज्यभर फिरुन माहिती घेऊन एक अहवाल देतील. याचा अर्थ असा आहे की, राज्य सरकार सकल मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सकारात्मक आहे असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.

एका मराठा समाजाच्या तरुणाने आत्महत्या केली आहे ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही तीव्र भावना प्रत्येक समाजात असते. परंतु इतकं टोकाचं पाऊल व्यक्तीगत जीवनात उचलून जीवनच संपवणं ही बाब आम्हा सर्वांसाठी गंभीर असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.

लोकसभेला महायुती म्हणून सामोरे जाऊ

लोकसभेच्या जागा आम्ही लढणार आहोत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीला तिन्ही पक्ष सामोरे जातील, त्यावेळी राज्य पातळीवर आमची चर्चा होईल. आमच्या तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसतील. यासंदर्भातील अंतिम निर्णय दिल्लीतील शिर्षस्थ नेत्यांकडून होईल. पण एक बाब नक्की आहे की, कोण किती जागा लढवणार हे आज सांगू शकत नाही. परंतु तिघेही एकत्र एनडीए म्हणून, महायुती म्हणून सामोरे जाणार असल्याचेही तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना नमूद केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे हेही उपस्थित होते.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात