चेन्नई
कोरोनामुळे एक ज्येष्ठ नेत्याचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार आणि डीएमडीके नेता विजयकांत यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.
देसिया मुरपोक्कु द्रविड कडगमचे नेता आणि जुन्या काळातील प्रसिद्ध तमिळ अभिनेता विजयकांत यांचं गुरुवारी चेन्नईच्या एका रुग्णालयात निधन झालं. ते ७१ वर्षांचे होते.
मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्थोपेडिक्स अँड ट्रॉमेटॉलॉजी इंटरनॅशनलने एक पत्र प्रसिद्ध केलं आहे. यानुसार विजयकांत यांना न्युमोनियावरील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून ते व्हेटिंलेटरवर होते. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र २८ नोव्हेंबर २०२३ च्या सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विजयकांत यांच्या रिपोर्टनुसार, ते कोविड पॉझिटिव्ह होते आणि त्यांना श्वास घेण्यास त्रासही जाणवत असल्याने व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आलं होतं.
मिळालेल्या माहितीनुसार, विजयकांत गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच त्यांची पत्नी प्रेमलता यांनी पक्षाची जबाबदारी स्वीकारली होती.
 
								 
                                 
                         
                            
